मुंबई : गणेशोत्सव, जन्माष्टमी आणि सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरात विमानाच्या तिकीट दरांनी जोरदार उड्डाण घेतले आहे. सणासुदीच्या काळात हवाई प्रवासासाठी प्रवाशांना मोठी रक्कम मोजावी लागणार असून, वाढलेल्या तिकीटदरांचा थेट फटका प्रवाशांच्या खिशाला बसत आहे.
राखी पौर्णिमा, जन्माष्टमीमुळे प्रवाशांची संख्या वाढली असून, सलग सुट्ट्यांमुळे अचानक बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच धार्मिक आणि पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा ओढा असल्याने विमान तिकीटदरांवर परिणाम झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद विमान तिकीट २६ हजारांपर्यंत पोहोचले आहे. मुंबई-आग्रा मार्गावरील तिकीट दर २५ ते ४० हजारांपर्यंत गेले आहेत. मुंबई-जम्मू-काश्मीरसाठी १८ ते २० हजार रुपये, तर मुंबई-दिल्लीसाठी ६ ते १७ हजार रुपयांपर्यंत तिकीटदर आहेत.
मुंबई-अयोध्या विमान तिकीट २३ हजारांवर, मुंबई-जगन्नाथ पुरी २० हजारांवर, तर मुंबई-अहमदाबाद २६ हजारांवर पोहोचले आहे. मुंबई-गोवा मार्गावरील तिकीटदर सुमारे ७ हजार रुपये, तर मुंबई-उदयपूरचे तिकीट २० हजार रुपयांपर्यंत आहे.
सणासुदीच्या काळात पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने विमान तिकीटदरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हवाई प्रवासाचा खर्च वाढल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.