

मुंबई : विमान तिकीट बुकिंग केल्यानंतर त्यात 48 तासांत बदल केल्यास प्रवाशांना कोणताही भुर्दंड सोसावा लागणार नाही. या कालावधीत तिकीट रद्द करून दुसरे तिकीटदेखील घेता येणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) हा बदल प्रस्तावित केला आहे.
ट्रॅव्हल एजंट अथवा पोर्टलद्वारे तिकीट खरेदी केल्यास परताव्याची जबाबदारी संबंधित एअरलाईन्सवर असेल. कारण, एजंट हे विमान कंपन्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी असतात, असेही ‘डीजीसीए’ने स्पष्ट केले आहे. रकमेचा परतावा 21 कार्यालयीन दिवसांत करावा, असेही ‘डीजीसीए’ने प्रस्तावात म्हटले आहे. तिकीट बुकिंग केल्यानंतर 24 तासांच्या आत प्रवाशाने त्याच्या नावातील दुरुस्ती लक्षात आणून दिल्यास त्यात विनाशुल्क दुरुस्ती करावी लागेल. मात्र, असे तिकीट विमान कंपनीच्या संकेतस्थळावरून बुकिंग केलेले हवे. तिकीट रद्द केल्यानंतर मिळणाऱ्या परताव्यावरून अनेक तक्रारी दाखल होत असल्याने ‘डीजीसीए’ने नवीन बदल प्रस्तावित केले आहेत.
तिकीट बूक केल्यानंतर 48 तासांच्या कालावधीत प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तिकीट रद्द करू शकतात किंवा त्यात सुधारणा करू शकतील. एखाद्या प्रवाशास विमान तिकिटात बदल करायचे असल्यास बदल केलेल्या तिकिटाचे पैसे अधिक असल्यास तितकी रक्कम त्यास मोजावी लागेल. विमान कंपनीच्या संकेतस्थळावरून थेट तिकीट बूक केल्यावर बुकिंग तारखेपासून देशांतर्गत उड्डाणासाठी 5 दिवसांपेक्षा कमी आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी 15 दिवसांपेक्षा कमी कालावधी असल्यास या सुविधेचा वापर करता येणार नाही, असेही ‘डीजीसीए’ने स्पष्ट केले आहे.
तिकीट बुकिंगच्या 48 तासांपेक्षा जास्त कालावधीनंतर हा पर्याय उपलब्ध नाही. त्यासाठी प्रवाशाला अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ‘डीजीसीए’ने उद्योग घटकांकडून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत या प्रस्तावावर सूचना मागविल्या आहेत.
वैद्यकीय कारणासाठी विशेष सवलत?
वैद्यकीय आणीबाणीमुळे प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास विमान कंपन्या तिकिटांची परतफेड करू शकतात अथवा संबंधित प्रवाशाला त्याचे क्रेडिट देऊ शकतात. पुढील विमान तिकिटाच्या बुकिंगवेळी त्यांना ही रक्कम वापरता येईल.