

Ganesh idol fitness certificate: गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याचे तसेच गणेशमूर्तीच्या जडणघडणीपासून ते मूर्तीची मंडळाला डिलिव्हरी होईपर्यंतची संपूर्ण माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे वृत्त तुफान व्हायरल झाले होते. भुलेश्वरचा राजा आगमन मिरवणुकीवेळी झालेल्या दर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात होते.
मात्र आता खुद्द बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत मोठा खुलासा केला आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून अशा प्रकारचे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. गणेशोत्सव मंडळ तसेच गणेश भक्तांनी अशा माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.
भुलेश्वरचा राजा गणेश मुर्ती दुर्घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता एक टनापेक्षा अधिक वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्याबाबत अथवा मूर्तीच्या जडणघडणीपासून ते तिच्या वितरणापर्यंतची संपूर्ण माहिती नोंदविणे बंधनकारक करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणताही निर्णय घेतला आहे असे वृत्त समाजमाध्यांमध्ये आले होते. मात्र अशा स्वरूपाचे कोणतेही निर्देश जारी केलेले नाहीत असे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.
त्यामुळे या संदर्भात समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या संदेशांवर अथवा वृत्तांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या आगमनादरम्यान सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गणेश मंडळांनी गणेशमूर्तींच्या आगमन सोहळ्याचे नियोजन करताना पोलीस विभाग, वाहतूक विभाग तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
गणेशोत्सव उत्साहात, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही महानगरपालिकेने आवाहन केले आहे.