

मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गंभीर अनियमितता आढळल्याने मुंबईतील सर जे. जे. महानगर रक्तपेढी आणि ठाण्यातील बदलापूर येथील माया ब्लड सेंटर यांचे रक्तसंकलन, रक्तघटक निर्मिती, परीक्षण, साठवणूक, वितरण आणि रक्तदान शिबिरांसह सर्व कामकाज पुढील आदेशापर्यंत तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
२२ ते २४ जूनदरम्यान एफडीए आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) यांच्या संयुक्त तपासणीत दोन्ही रक्तपेढ्यांमध्ये औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १९४० आणि औषधे नियम, १९४५ अंतर्गत रक्तपेढी संचालनासंबंधीच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघड झाले.
जे. जे. महानगर रक्तपेढीत रक्त व रक्तघटकांच्या साठवणुकीतील त्रुटी, रिअॅक्टिव्ह व कालबाह्य रक्तपिशव्यांच्या हाताळणीतील निष्काळजीपणा, जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीतील कमतरता,व्यवस्थापनातील अपयश, नादुरुस्त उपकरणे आणि आवश्यक निर्जंतुकीकरण नियंत्रणाचा अभाव आढळून आला.
तर माया ब्लड सेंटरमध्ये रक्तवाहतुकीच्या नोंदींचा अभाव, रक्तपिशव्यांच्या ट्रेसिबिलिटीतील त्रुटी, आवश्यक तांत्रिक कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, उपकरणांचे कालबाह्य प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण चाचण्यांचा अभाव, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनातील अनियमितता आणि रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक परवानग्या व अभिलेख नसल्याचे निदर्शनास आले.
एफडीएच्या मते, या त्रुटींमुळे रक्त व रक्तघटकांची सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारकता धोक्यात येण्याची शक्यता असून रक्तदाता व रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी दोन्ही रक्तपेढ्यांचे कामकाज तातडीने बंद करण्यात आले आहे.
रक्तपेढ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रक्त ही जीवनरक्षक बाब असल्याने त्याच्या संकलन, प्रक्रिया आणि वितरणात सर्वोच्च गुणवत्ता, सुरक्षितता आणि पारदर्शकता राखणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. रक्तदाता आणि रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही निष्काळजीपणा किंवा नियमभंग सहन केला जाणार नाही. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.