

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी राज्यभरात २१ आस्थापनांवर धाडी टाकल्या असून एकूण ७ लाख ४३ हजार ११४ किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये १७ आरोपींना अटक केली असून तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई केली.
त्यामध्ये नागपूर विभागात १ आस्थापनेविरुद्ध कारवाई करून १,९१,४४५ रुपये किमतीचा माल, १ वाहन जप्त करण्यात आले असून एकाला अटक केली आहे. तर नाशिक विभागात एका आस्थापनेविरुद्ध कारवाई करून १,६४,४३४ रुपये किमतीचा माल व एक वाहन जप्त केले असून एकाला अटक केली.
बृहन्मुंबई विभागात १३ आस्थापनांची तपासणी करून १,००,४१७ रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. एकूण ८ व्यक्तींना अटक केली. कोकण विभागात एका आस्थापनेविरुद्ध कारवाई करून १,३२,९७0 किमतीचा माल जप्त केला तर छत्रपती संभाजीनगर विभागात दोन आस्थापनांविरुद्ध कारवाई करून १,२४,०८० रुपये किमतीचा माल,एक वाहन जप्त करण्यात आले.
पुणे विभागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एका आस्थापनेवर कारवाई करून २५६५ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिेतेचे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याचे कलम २६, २७, ३०(२) (अ) आणि कलम ५९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.
अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे.
शंका येताच तक्रार करा
अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका येताच नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. तक्रार करतेवेळी स्वतःचे नाव व पत्ता/संपर्क क्रमांक, भेसळ केल्या जाणाऱ्या ठिकाणाचा, त्या आस्थापनेचा अचूक पत्ता व कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची माहिती तक्रारीत नमूद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.