

मृणालिनी नानिवडेकर
मुंबई: मतदारसंघ फेररचना आणि महिला आरक्षण विधेयक पारित व्हावे, यासाठी भारतीय जनता पक्ष येणाऱ्या प्रत्येक खासदाराचे स्वागत करीत आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने या दोन्ही विशेषतः महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्यायची तयारी दाखवली असल्याने या पक्षात कोणतीही अस्वस्थता निर्माण करण्याचा भाजपचा विचार नसल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदारही सत्ताधारी युतीच्या दिशेने पावले टाकण्यास तयार आहेत. मतदारसंघातील विकासकामांना गती मिळत असेल, तर भूमिका बदलण्यास हरकत नाही, असे किमान ४ ते ५ खासदारांना वाटते. मात्र, पक्ष नेतृत्वाचा शब्द विधेयकाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करायचा असल्याने त्या पक्षात कोणतीही हालचाल ना घडवली जाणार आहे, ना घडणार आहे, असे समजते.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला २०१९ मध्ये बहुमत मिळाले तरी सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक पक्षांबद्दल अढी आहे. त्यावेळी आव्हान देणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची शकले झाल्यानंतरही आज घडलेल्या खासदारांच्या पक्षफुटीसंदर्भातील घटना याही दोन्ही विधेयके पारित होण्यासाठी मदतशीर ठरणार आहेत.
शिवसेनेतील काही अतिवरिष्ठ नेत्यांनी आमचे सर्वात महत्त्वाचे नेतेही विधेयकाबद्दल शब्द देतील, अशी तयारी भाजपच्या नेत्यांना दाखवली होती; पण आम्ही आता उद्धव ठाकरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवू शकत नाही, असे भाजपच्या दिल्लीस्थित नेत्यांनी कळवल्याचे समजते.
शिवसेनेने ज्या पद्धतीने टीका केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांवरही टीका केली ते लक्षात घेता आता झाले गेले विसरून पुढची एकत्र वाटचाल अशक्य आहे, असे भाजपचे मत आहे.
मतदारसंघ फेररचना विधेयकाला विरोध नाही
मतदारसंघ फेररचना विधेयकाला विरोध न करण्याचा राष्ट्रवादीचा शब्द आगामी काळातील पुढच्या २० वर्षांच्या राजकारणाचा पट लक्षात घेता, भाजपला मतदारसंघ फेररचना प्रत्यक्षात आणायची आहे. त्यासाठी आवश्यक असलेले दोनतृतीयांश संख्याबळ भाजपला हवे आहे.
आम्ही या विधेयकाबाबत विरोधी मतदान करणार नाही, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसने दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी ‘या विधेयकांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विरोध नसेल एवढेच सध्या बोलतो,’ असे ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. या संबंधित योग्य चर्चा झाल्या आहेत, असेही समजते.