

मुंबई : प्रकाश साबळे
आशियातील सर्वात मोठी पणत्यांची बाजारपेठ ओळखल्या जाणाऱ्या धारावी कुंभारवाड्यातील पारंपरिक पणत्यांसह फॅशनेबल पणत्यांची छाप यंदाही महामुंबईच्या बाजारात दिसत आहे. 40 ते 150 रुपयांपर्यंत या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे परदेशातील मागणीही यावर्षी वाढली असून येथून आतापर्यंत 100 टन माल अमेरिका, जपान, लंडन, दुबई आदी देशांत निर्यात केल्याचे येथील कुंभार व्यवसायिकांनी सांगितले.
धारावीतील कुंभारवाड्यात अनेक वर्षांपासून कुंभार समाज दिवाळीत हा पणत्यांचा व्यवसाय करतात. येथे 60 दुकाने असून 450 घरांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हे काम युद्धपातळीवर सुरू होते. आता येथून मागणीनुसार पॅकिंगचे काम सुरू आहे. तसेच किरकोळ ग्राहकांचीही मोठी मागणी असल्याचे कारागीर दिनेशवाला यांनी सांगितले.
हाताने पणत्या बनवल्यानंतर त्या दोन दिवस सुकविल्या जातात. यानंतर त्या भट्टीमध्ये भाजून पुढे त्यावर विशिष्ट रंगकाम, सजावट केली जाते. यानंतर त्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात. पणती विक्रीतून दरवर्षी येथे 10 ते 12 कोटींची उलाढाल होते. अमेरिका, लंडन, युरोपसह इतर देशांमध्ये येथील पणत्यांना मागणी आहे. आतापर्यंत यावर्षी 100 टन माल परदेशात पाठवल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
बाजारात विक्रीसाठी आलेल्या पणत्यांचे सुमारे 100 प्रकार आहे. यात साधा दिवा, स्प्रे दिवे, झरी कोनवर्क, पेन्टिंग कोनवर्क, तुळशी कोनवर्क, डायमंड पान, गोल्डन मोरपख, सिल्वर हार्टसेफ, पता कलरफुल तसेच प्राण्याचे, पक्षी आणि मोम दिवा, विद्युत लाईट दिवा असे विविध प्रकार आहेत.
गेल्या 40 वर्षांपासून पणत्या बनविण्याचे काम करतो. पणत्या बनविणे ही हाताची कला आहे. कुठलाही टेप न लावता हाताच्या बोटावर पणत्या बनविल्या जातात. एका दिवसांत 500 ते 100 पणत्या बनविल्या जातात, असे कारागीर मनसुख देवरिया यांनी सांगितले. कुंभारवाड्यातील कच्च्या पणत्या घेऊन त्यावर रंग, टिकल्या लावणे, लाईट लावणे आणि पॅकिंग करणे आदीं कामांसाठी 10 ते 15 कामगार दिवस - रात्र काम करतात. डिजाईनवरून पणत्यांचा भाव ठरवला जातो, असे पणती व्यावसायिक भरत जेठवा यांनी सांगितले.
कुंभारवाड्यात 60 दुकाने असून 450 घरांमध्ये पणत्या तयार केल्या जातात. येथे बनवलेल्या पणत्यांना महामुंबईसह देशभरात मागणी असते. परदेशातही मोठी मागणी आहे. पणत्यांची ऑनलाइन विक्री होते. मात्र हे काम आम्ही करीत नाही. दहा ते बारा कोटींची उलाढाल दरवर्षी होते.
महेश परमार, पणती विक्री व्यावसायिक