

मुंबई : आगामी महापालिका निवडणुका या एकत्र लढविण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एकमत झाले आहे. मात्र, जिथे युती होणारच नाही तिथे एकमेकांवर आरोप न करता मैत्रीपूर्ण लढती होतील.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी रात्री उशिरा सुमारे दीड ते दोन तास महापालिका निवडणुकीसाठी युती करण्याच्या विषयावर चर्चा झाली. ही बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी झाली. बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणीही उपस्थित नव्हते.
आधी युतीचेच प्रयत्न
सूत्रांनी सांगितले की, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत झालेला संघर्ष पाहता महापालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्याचा निर्णय फडणवीस-शिंदे बैठकीत झाला. आगामी महापालिका निवडणुका या एकत्र लढविण्यासाठी लगेच स्थानिक पातळीवर बोलणी सुरू करण्यात येणार असून ज्या ठिकाणी बोलणी फिसकटतील, तिथे प्रदेश स्तरावरून हस्तक्षेप केला जाईल. जिथे युती होणारच नाही तिथे मैत्रीपूर्ण निवडणूक लढविण्यात येईल, एकमेकांवरील आरोप टाळण्यात येतील, असे बैठकीत ठरले.
अधिवेशनानंतर चर्चा
महापालिकेसाठी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेसह सर्वत्र युती करण्यासाठी तत्काळ बोलणी सुरू करावी, असे ठरले असून त्यासाठी अधिवेशन संपताच स्थानिक नेते चर्चा करणार आहेत. महायुतीतील घटक पक्षांतील नेत्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश न देण्यावरही बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
संघर्ष टाळण्यावर एकमत
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी युती झाली नसल्याने भाजप-शिवसेना एकमेकांच्या समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यात अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण झाला. सिंधुदुर्ग, हिंगोली जिल्ह्यात तर हा संघर्ष टोकाला गेला. त्या संघर्षाची पुनरावृत्ती महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत टाळण्यावर बैठकीत एकमत झाले. ही बैठक होण्यापूर्वी शिवसेना मंत्र्यांची बैठक झाली. तसेच भाजपनेही बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.