

नागपूर : महाराष्ट्राच्या विधानसभेत आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नेतेपदी नेमले जावे अशी मागणी शिवसेनेतील एका गटाने पुढे केली असल्याने नाराज झालेले भास्कर जाधव उबाठा गटात आधीच नाराज असलेल्या काही आमदारांसमवेत शिवसेनेतून बाहेर पडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशन आणि फोडाफोडी या समीकरणाची पुनरावृत्ती पुन्हा होईल काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जातो आहे.
मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या या सरकारवरील घणाघाती आरोपांमुळे लोकप्रिय झालेल्या आणि शिवसैनिकांना आधार वाटणाऱ्या आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नेता नेमावे याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या काही शिवसैनिकांनी हालचाली सुरू केल्या. त्यानंतर तसा प्रस्ताव विधिमंडळाकडे पाठवण्यात आला अशी जोरदार चर्चा आहे. भास्कर जाधव यांच्या विरोधी पक्ष नेतेपदावरील नियुक्तीला एकनाथ शिंदे गटाने विरोध केल्याने हे पद आदित्य यांना का देऊ नये असा विचार समोर आला आहे.
भास्कर जाधव यांच्यावर कोकणातील उबाठा नेते विनायक राऊत यांची आता मर्जी राहिलेली नाही. त्यामुळे ते भाजपच्या संपर्कात आहेत असे सांगण्यात येते. शिवाय भास्कर जाधव यांच्या वक्तव्यांची धार आदित्य यांच्या हल्ल्यापेक्षा एकसूरी आणि आक्रस्ताळी असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आदित्य यांनाच या पदावर नेमणे उचित ठरेल अशी या गटाची भूमिका आहे.
शिवसेनेतील एका गटाने आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आलेले नाही हे सत्तापक्षाने पेरलेली चर्चा आहे याकडेही लक्ष वेधले आहे. काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते पदाची नेमणूक प्रलंबित असून आता हा प्रश्न तसाच ठेवणे सरकारच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरेल अशीही चर्चा सत्ताधारी वर्तुळात सुरू आहे.दोन दिवसांपासून काही नव्या घडामोडी सुरु झाल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा हा विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या अखत्यारित येतो अशी भूमिका घेत असले तरी आजवर नेहमीच या पदावरील व्यक्ती नेमताना सत्ताधा-यांचे मत लक्षात घेतले जाते. मात्र या एकूणच हालचालीमुळे अस्वस्थ झालेले फायर ब्रँड भास्कर जाधव यांनी नाराज उबाठा आमदारांची मोट बांधणे सुरु केले असल्याचे समजते. काही नाराज आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. कोकणात असे घडल्यास उबाठाला धक्का बसेल, शिंदे गट या घडामोडीकडे लक्ष ठेवून आहे.