

मुंबई : राज्यातील फूल उत्पादक शेतकरी आणि पर्यावरणाचे नुकसान विचारात घेऊन प्लास्टिक फुलांच्या बाजारावर महानगरपालिकांनाही कारवाई करण्याचे अधिकार दिले जातील. तसेच, प्लास्टिक फूलबंदीसाठी लवकरच विशेष सूचनाही काढली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. प्लास्टिक व कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्यात येईल. प्लास्टिक फुलांचा वापर करणारे डेकोरेशन व्यावसायिक, बँक्वेट हॉल्स आणि इतर संबंधित घटकांनाही नोटिसा दिल्या जातील. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात प्लास्टिकबंदी अस्तित्वात असली, तरी बाजारपेठेत कृत्रिम (प्लास्टिक) फुलांचा वाढता वापर शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर परिणाम करत आहे. प्लास्टिकबंदीच्या विद्यमान अधिसूचनेअंतर्गतच विशेष अधिसूचना काढली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोलबंदी अधिसूचनेनुसार, सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकोलवर पूर्णतः बंदी आहे. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सण-उत्सव काळात कृत्रिम फुलांचा वापर टाळण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत 1 लाख 24 हजार 783 आस्थापनांची तपासणी करण्यात आली, यापैकी 3 हजार 390 आस्थापनांवर कारवाई करून 1 कोटी 55 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
टाकळी ढोकेश्वर सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा
टाकळी ढोकेश्वर येथे सौरऊर्जा प्रकल्पामुळे 2 हजार 33 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी हा प्रश्न विचारला होता.
पारेषण लाईन्सखाली शेती करणे अवघड ठरत असल्याने संबंधित शेतकऱ्यांची परवानगी घेऊन त्यांना जोखमीच्या मोबदल्यापोटी सुमारे 30 टक्क्यांपर्यंत भरपाई दिली जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.