

नवी मुंबई : राजेंद्र पाटील
गुरुवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सराफ बाजारात सोने खरेदीच्या मागणीत वाढ झाली असून, बुधवारी दीड लाख रुपये तोळा असलेले सोने गुरुवारी 19 मार्चला तीन ते चार हजार रुपयांनी वाढून 1 लाख 54 हजार रुपयांपर्यंत पोहचेल.
मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदीला चांगली तेजी असून अंदाजे 200 किलो म्हणजे साधारणत: 300 कोटींची तर राज्यात 100 किलो म्हणजे 150 कोटींची सोने विक्रीतून उलाढाल होण्याची शक्यता असल्याचे इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीला सांगितले.
ग्राहकांनी खास गुढीपाडव्यासाठी 2 ते 20 ग्रॅमपर्यंत वजनाच्या सोन्याच्या कॉईनची आगाऊ बुकिंग केली. सुमारे 50 कोटींची ही बुकिंग आहे. गेल्या दोन दिवसांत 2 ते 20 ग्रॅम वजनाच्या सुवर्णनाण्यांची 20 टक्के विक्री एकट्या मुंबईत झाली. 16 मार्चला एक तोळे सोने 1 लाख 70 हजार रुपये तर 17 मार्चला 1 लाख 60 हजार रुपये तोळे, 18 मार्चला 1 लाख 50 हजार रुपये तोळे आणि उद्या पाडव्याला 1 लाख 54 हजार रुपये तोळे असण्याची शक्यता आहे.
2019 साली 39 हजार रुपये प्रतितोळे सोने होते. तेच 2023 मध्ये 59 हजारांच्या पुढे गेल्याने त्याचा परतावा खरेदीदारांना चांगला मिळाला. 2024 च्या एप्रिलमध्ये 74 हजार रुपयांपर्यंत दर पोहोचला.29 मार्च 2025 मध्ये 92 हजार रुपये तोळे सोन्याचा दर होता. यंदा 2026 ला गुढीपाडव्याला दीडलाखाचा टप्पा प्रतितोळे सोन्याच्या दराने पार केला.