

Maharashtra Rain Alert
राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः रागयड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
१९ ते २५ मे दरम्यान कर्नाटक, कोकण, गोवा आणि केरळ आणि लगतच्या द्वीपकल्पीय भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. २० आणि २१ मे रोजी कर्नाटकमध्ये आणि २१ मे रोजी कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला.
नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पुढारी तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांत विजाच्या कडकडासह जोरदार वारे वाहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडू शकतो. गोव्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून अंदमानमध्ये पोहोचला आहे. २७ मे च्या दरम्यान केरळमध्ये त्याचे आगमन होण्याची शक्यता आहे. तिथून तो कोकणात दाखल होईल. कोकणातून पुढे तो महाराष्ट्र व्यापेल. दरम्यान, १९ मे २०२५ रोजी मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगालचा उपसागर, मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भाग व्यापला.
मान्सून पुढील २ ते ३ दिवसांत दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्राचा उर्वरित भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.