

The lightning strike |
निमोणे : पहाटेपासूनच आकाशात गडद ढगांची गर्दी... जोरदार वार्याचा लपंडाव... आणि त्यातच अविरत बरसणारा पाऊस. अशा परिस्थितीतही शेतकरी कुटुंबांचे जीवन कधीच थांबत नाही. हातातील कामे आणि जबाबदार्या निभवाव्याच लागतात. अशातच निमोणेच्या (ता. शिरूर) जाधव वस्तीतील हेमा दिनकर जाधव या नेहमीप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास घराच्या भिंतीलगत आडोशाला बसून भांडी घासत होत्या. काय घडलं याची कल्पना येण्याच्या आत, एक जबरदस्त आवाज झाला... जणू आकाशाचा कोपच खाली कोसळला! क्षणात त्या जमिनीवर कोसळल्या... शरीर बधिर झाल्यासारखं, कान सुन्न झालेले... क्षणभरासाठी त्यांना वाटलं, सगळं संपलं! पण नशीब बलवत्तर होते. (Pune news update)
त्यांच्या पाठीमागील भिंतीवर वीज कोसळली होती. विजेच्या तडाख्याने भिंतीला खोल तडे गेले, घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे भस्मसात झाली. इतकंच नव्हे, तर परिसरातील रोहित्रही जळाले. वीज पडलेले ठिकाण हे केवळ काही फुटांचे अंतरावर होते, अन्यथा हेमा यांच्या जीवावर बेतले असते. सुदैवाने या अपघातातून थोडक्यात बचावल्या. या घटनेची माहिती मिळताच सरपंच राजश्री गव्हाणे, पोलिस पाटील इंदिरा जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबन ढोरजकर आणि ज्येष्ठ नागरिक जे. आर. काळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व नुकसानीचा आढावा घेतला