

मुंबई : नरेश कदम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने शनिवारी (दि.1) मतचोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. असे असले तरी भाजपप्रणीत सत्तारूढ महायुतीवर दबाव वाढवला आहे. सत्याच्या मोर्चाला आघाडीचे केवळ नेते उपस्थित होते, पण ठाकरे बंधूंनी रस्त्यावर शक्तिप्रदर्शन केले.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी, मतचोरीचा मुद्दा जोरदारपणे मांडला असला तरी महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी उचलून धरला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतचोरीवरून वातावरण बनविण्याचा प्रयत्न केला आहे. मतचोरीचा मुद्दा असला तरी या मुद्द्याच्या माध्यमातून मनसे आणि शिवसैनिक (ठाकरे गट) यांच्या मनोमिलनाचाही हा भाग आहे.
बिहार विधानसभेची निवडणूक असल्यामुळे काँग्रेस थोडी अलिप्त भूमिका घेत आहे. मतचोरीचा मुद्दा राहुल गांधी यांनी सर्वप्रथम काढला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आम्ही सत्याच्या मोर्चात सामील झालो असल्याचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे नेते मोर्चात हजर होते, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे कोणते ना कोणते कारण पुढे करून ठाकरे बंधूंपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिवारच्या मोर्चालाही ते उपस्थित नव्हते. हा काँग्रेस आणि ठाकरे बंधूंची पडद्यामागील रणनीतीचाही भाग असू शकतो.
सत्याच्या मोर्चातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोगस मतदार दिसला तर त्याला फटकवा, असा आदेश ठाकरे बंधूंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोगस मतदारांचा फटका बसू नये, यासाठीची खबरदारी ठाकरे बंधू आणि आघाडीचे नेते घेत आहेत. एक प्रकारे आयोगापेक्षा महायुतीवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे. याबरोबर मनसेला अधिकृतपणे आघाडीत सामावून घेतले नसले एकाच व्यासपीठावर येऊन संदेश दिला आहे.
निवडणूक दोन्ही बाजूंसाठी अस्तित्वाची आघाडी आणि ठाकरे बंधू यांचा हा प्रयोग यशस्वी झाला तर भाजप आणि मित्रपक्षांसाठी ही धोक्याची घंटा असेल. एकीकडे ठाकरे बंधूंचा सत्याचा मोर्चा असताना दुसरीकडे भाजपने तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मूक आंदोलन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी, ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा संघर्ष पेटला असून ही निवडणूक दोन्ही बाजूंसाठी अस्तित्वाची झाली आहे.