

मुंबई : चालूवर्षी भारताला ‘अल निनो’ या हवामान स्थितीचा सामना करावा लागू शकतो, असे हवामान अहवालावरून दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय उपखंडातील पर्जन्यमान घटून त्याचा फटका कृषी क्षेत्रासह विविध उद्योगांना होण्याची भीती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
अहवालानुसार, निनो 3.4 या समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमान (एसएसटी) निर्देशांकातील नवीन आकडेवारीनुसार, ‘अल निनो’चे दक्षिणेकडील दोलन सध्या तटस्थ आहे. परंतु, 2026 च्या उत्तरार्धात सकारात्मक संक्रमण होऊ शकते. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतीय मान्सूनवर ‘अल निनो’-दक्षिण दोलन (ईएनएसओ) आणि हिंदी महासागर द्विध्रुवीय (आयओडी) च्या हालचालींचा प्रभाव पडतो. जर ‘अल निनो’ नकारात्मक आयओडी सोबत असल्यास पर्जन्यमानात घट होते. सध्या, आयओडी नकारात्मक टप्प्यात आहे आणि अंदाजानुसार ‘अल निनो’ तयार होण्याची शक्यता 40 ते 60 टक्क्यांच्या आसपास आहे.
मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या (पॅसिफिक) तापमानात सरासरीपेक्षा होणारी मोठी वाढ म्हणजे ‘अल निनो’ प्रभाव असतो. या नैसर्गिक घटनेमुळे वारे कमकुवत होतात. त्याचा परिणाम जागतिक पर्जन्यमान वितरणात होतो. विशेषतः, भारतीय उपखंडातील पर्जन्यमान घटते अथवा पाऊस उशिराने येतो. परिणामी,
दुष्काळसदृश स्थिती निर्माण होते. प्रशांत महासागरातील उष्णकटिबंधीय भागात वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. ‘अल निनो’ काळात हे वारे कमकुवत होतात. जेव्हा प्रशांत महासागरातील पाणी सामान्यपेक्षा जास्त थंड होते, त्या स्थितीला ‘ला निना’ म्हणतात. त्यामुळे भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडतो.