

मुंबई: मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांच्या विधिमंडळातील कामकाजाचा भार अन्य मंत्र्यांकडे सोपविला. मात्र, या प्रभारी मंत्र्यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी आक्षेप घेत आपला विरोध दर्शविला.
विशेषतः ठाकरे शिवसेनेने यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. तसेच सरकार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध करत सभात्याग केला.
प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. काल जो त्यांना जोर का झटका धीरे से लागला, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि पुढे आणखी झटके बसणार आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला फटकारले.
पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे.
यात मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसेंकडे सार्वजनिक बांधकाम, शंभूराज देसाईंकडे गृहनिर्माण, उदय सामंतांकडे नगरविकास, हसन मुश्रीफांकडे राज्य उत्पादन शुल्क, तर अदिती तटकरे यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचा प्रभार देण्यात आला आहे.
विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याला आक्षेप घेतला. सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपविणे चुकीचे आहे. नवीनच प्रथा या सरकारने सुरू केली आहे. मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर राज्यमंत्री आहेत.
अपवादात्मक परिस्थितीत प्रभारी मंत्री नेमता येतात, असे मुद्दे विरोधकांनी मांडले. मंत्री जबाबदारी टाळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. विरोधकांचा सारा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. त्यावर नियमानुसार मंत्रिमंडळाची जबाबदारी सामूहिक असते.
सर्व मंत्री हे कामकाजातील प्रत्येक उत्तराला सामूहिकपणे जबाबदार असतात. त्यामुळे प्रभारी मंत्री नेमणे गैर नाही. यापूर्वी २०१९ आणि २०२० मध्येही असा प्रभार देण्यात आल्याचा निर्वाळा विधानसभाध्यक्षांनी दिला. त्यांचा रोख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होता.
त्यावर ठाकरेंच्या काळात असे घडले नसल्याचा दावा विरोधकांनी केला. आदित्य ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत तेव्हा असे घडले नव्हते, चुकीची माहिती पटलावर येत आहे. मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर सांगावे, असे म्हणत तीव्र विरोध केला आणि शेवटी सभात्याग केला.
सभागृहाचे कामकाज पूर्णपणे नियमांनुसार चालत असून प्रश्नांची उत्तरे ऐकण्याऐवजी गोंधळ घालणे आणि स्टंटबाजी करणे एवढाच विरोधकांचा कार्यक्रम राहिला आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.