

मुंबई: राज्य पोलीस दलातील चौदा आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या मंगळवारी सायंकाळी गृहविभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी जाहीर केल्या. नागपूर शहर पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील यांची, तर सायबर विभागाचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरारचे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
मंगळवारी गृहविभागाकडून राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली, तर नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर-वसई-विरारचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांची राज्य गुन्हे अभिलेख विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस महानिरीक्षक, तर सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरारचे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची नवी मुंबईतील डायल ११२, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांची नांदेड, नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची पुणे शहर, बुलढाण्यातील खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोंढा यांची हिंगोली, नवी मुंबईतील डायल ११२ च्या पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ.
नागपूरचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांची छत्रपती संभाजीनगरला, अमरावतीचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांची नागपूरला, चंदूपरच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सतराचे समादेशक पीयूष जगताप यांची बुलढाण्यातील खामगावला.
गडचिरोलीच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेराचे समादेशक नारायण शिरगावकर यांची अहिल्यानंतर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एकोणीसचे समादेशक म्हणून, तर अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक प्रांजली सोनावणे यांची अमरावती येथे बदली करण्यात आली आहे.