

Eknath Shinde
मुंबई : विरोधकांनी उपस्थित केलेले विविध प्रश्न आणि आरोपांना आज गुरुवारी (दि.१७ जुलै) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उत्तर दिले. 'कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता?' असे शिंदे यांनी म्हणत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील रस्त्यांबद्दलच्या विरोधकांच्या आरोपानंतर शिंदे संतापलेले दिसून आले.
दिनो मोरियानं तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल, असा इशारा त्यांनी दिला. कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे भ्रष्टाचाराचा आरोप करतात. आम्ही तर रस्ते धुवायला गेलो, तुम्ही लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या. मिठीतला गाळ कोण काढतोय?. यांना गाळ काढायला मराठी माणूस दिसला नाही तर डिनो मोरिया दिसला, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
मतदानाच्या आधी म्हणायचं मराठी- मराठी आणि निवडून आल्यावर म्हणायचे कोण रे तू? अशीही शिंदे यांनी टोलेबाजी करत ठाकरेंवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या काळात सर्व ठप्प होतं. मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचे काम केले. काही लोकं नेहमी म्हणतात मुंबई तोडणार. पण आम्ही मुंबई तोडण्याचे नाही तर जोडण्याचे काम करतोय. मी इतिहासात जात नाही. कोणी स्थगिती आणली? कोणी काय केलं?, अशी टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली.
आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आहेत. काहींसाठी कंत्राटदार.... अशी टीकाही त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली.
निकृष्ट दर्जाचे काम कुणालाही करता येणार नाही. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही नवीन योजना आणली. पालिकेचा एकही एचटीपी प्लॅन नाही. हे का नाही केले?. गेली २० वर्षे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून काहींनी काम केले. आज सी-लिंकवर गेलो तर परदेशात गेल्याचा भास होतोय. गिरणी कामगारांबाबत आपण प्रयत्न करतोय. काही लोकं म्हणतात मराठी माणसावर अन्याय केला. मुंबईकर मुंबईच्या बाहेर का फेकला गेलाय? यावर विचार करायला हवा. पत्राचाळीत अनेक लोकं बेघर झाली. कोणी इतकी माया जमा केली?. मुंबईकरांना खुराड्यात कोणी ठेवलं? असे सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केले.
काही लोकांनी अर्धवट मुद्दे मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत नसल्याने काही लोकांनी मुद्दा उपस्थित केला. काही लोक म्हणाले, निवडणूका रोखून धरल्या. या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेत असते. ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्वांची भावना आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असून त्यानुसार निवडणुका होतील, असेही शिंदे म्हणाले.