Political news : कितने पास-कितने दूर

फोटो सेशनने विधिमंडळाचे सेशन अखेरच्या दिवसात गरमागरमीचे ठरले
Vidhan Parishad hot topics
मुंबई : उद्धव ठाकरे समोर येताच नजर टाळून चष्मा नीट करण्यात गुंतलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्याकडे हसत हसत बघणारे सभापती राम शिंदे आणि या अवघडलेल्या परिस्थितीची मजा घेणारे उद्धव ठाकरे हे छायाचित्र ‘फोटो ऑफ द डे’ ठरले.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत येण्याची दिलेली ऑफर जशी चर्चेचा विषय ठरली त्याहीपेक्षा अधिक चर्चा उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका फ्रेममध्ये आणणार्‍या फोटो सेशनची होत आहे. या फोटो सेशनने विधिमंडळाचे सेशन अखेरच्या दिवसात गरमागरमीचे ठरले.

शिवसेनेत उठाव करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचे आणि उद्धव यांचे वैर जगजाहीर आहे. तेव्हापासून आजपर्यंत हे दोन नेते कधीही एका व्यासपीठावर आलेले नाहीत. मात्र, बुधवारी विधानभवनात हा योग आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सदस्यत्वाचा कालावधी संपत असल्याने त्यांचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यांना निरोप देताना आयोजित केलेल्या फोटो सेशनच्या वेळी उद्धव आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले आणि तिथून पुढे जे काही घडले ते मोठे रंजक आणि चर्चेचा विषय ठरले. फोटोसेशनवेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे दूरच, त्यांच्या बाजूला बसणेही टाळले.

फोटो सेशनसाठी दहा खुर्च्या एका रांगेत लागल्या होत्या. राष्ट्रवादीच्या घड्याळाचा अचूक टायमिंग साधणारे उपमुख्यमंत्री अजित पवार वेळेवर पोहोचले. खुर्च्यांवरची नावे पाहून ते आपल्या जागेवर बसले. हळूहळू अन्य नेते येऊ लागले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे आल्या. मात्र सारे जमले तरी फोटो मात्र निघत नव्हता. कारण, अंबादास दानवे यांना आपल्या नेत्याची उद्धव ठाकरेंची प्रतीक्षा होती. अखेर उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. सर्वच नेत्यांनी आपापल्या आसनांवरून उठून त्यांचा सन्मान केला. एकनाथ शिंदे देखील त्यांच्या आसनावरून उठले.

सर्वच नेत्यांनी उद्धव यांना समोरच्या रांगेत बसण्याची विनंती केली. समोरच्या रांगेत बसायचे म्हणजे कुठे, या प्रश्नाने गम्मत सुरू झाली. उद्धव यांना बसण्यासाठी कुणाच्या शेजारची खुर्ची द्यायची?

एकनाथ शिंदे यांच्या शेजारच्या खुर्चीकडे निर्देश करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना स्थानापन्न होण्याची विनंती केली. त्यांच्या बाजूला सभापती राम शिंदे उभे होते. त्यांच्याच शेजारी उपमुख्यमंत्री शिंदे होते. उद्धव ठाकरे शिंदे यांच्या शेजारच्या खुर्चीकडे वळू लागताच उद्धव आणि शिंदे एकदम समोरासमोर आले. नजरेला नजर नको म्हणून शिंदे यांनी आपला चष्मा काढून पुसण्यास सुरुवात केली. मात्र, त्याआधी शिंदे यांची हालचाल कॅमेर्‍याने टिपली. उद्धव यांना माझ्या शेजारी बसवू नका, असे ते राम शिंदे यांचा हात पकडून खुणावत होते.

नीलम गोर्‍हे शिंदे यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या होत्या. मात्र, आपल्या नेत्याचा म्हणजे शिंदे यांचा विचार न करता त्यांनी उद्धव यांना शिंदे यांच्या शेजारच्याच खुर्चीवर बसण्याची विनंती केली. खुर्ची सोडून त्या बाजूलाही झाल्या. मात्र, शिंदे यांची अवघडलेली परिस्थिती तिरप्या नजरेने हेरत उद्धव नीलम गोर्‍हे यांना ओलांडून बावनकुळे यांच्या दिशेने पुढे झाले. साहजिकच गोर्‍हे शिंदेंशेजारच्या खुर्चीकडे सरकल्या आणि गोर्‍हे यांच्या खुर्चीवर, बावनकुळेंच्या शेजारी उद्धव स्थानापन्न झाले आणि शेवटी अंबादास दानवेंच्या निरोपाचा फोटो निघाला.

या संपूर्ण फोटोसेशनमध्ये उद्धव ठाकरे बिनधास्त तर एकनाथ शिंदे अवघडलेले आणि त्यांची मजा घेणारे भाजप नेते हे चित्र अधिक लक्षवेधी ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news