

मुंबई : काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि अमिन पटेल यांच्या मतदारसंघात किमान पाच हजार बांगलादेशी आणि रोहिंगे असल्याचा दावा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला होता. सत्ताधारी असलेले लोढा हे ध्रुवीकरणाच्या अजेंड्यासाठी काँग्रेस आमदारांना लक्ष्य करत आहेत. घुसखोरांची त्यांच्या मायदेशी रवानगी करण्यास या सरकारला कोणी अडवले होते का, असा प्रश्न करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मंत्री लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मतदार यादीतील घोळाचा मुद्दा पुढे करत महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीला लक्ष्य केले आहे, तर काँग्रेसच्या काळात घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांची नावे मतदार यादीत घुसविण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले.
काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि अमिन पटेल यांच्या मतदारसंघात किमान पाच हजार बांगलादेशी-रोहिंग्या आहेत आणि हे खोटे निघाले तर राजीनामा देईन, असे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणतात, असे सावंत यांनी नमूद केले. तसेच, अरे बाबा, सरकार तुमचे आहे ना! बांगलादेशी-रोहिंग्यांना त्यांच्या देशात पाठवायला तुम्हाला रोखले कोणी? तुम्हाला जमत नाही का? तुमचा उत्तर मुंबई भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षच बांगलादेशी निघाला होता हे विसरलात का?, अशी प्रश्नांची सरबत्तीही केली. तसेच, २००५-२०१३ या काळात काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने ८८ हजार ७९२ बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवले. तुमच्या २०१४-२०१९ या काळात मोदी सरकारने फक्त २ हजार ५६६ परत पाठवले गेले. नंतर मोदी सरकारने आकडे जाहीर करणे सोडून दिले. तरीही २०२१ ला केवळ २४६ आणि २०२३-२४ ला ४११ परत पाठवले गेले. खरे तर हा आकडा अजून खाली आला आहे, असेही सावंत म्हणाले.
तुमच्या सरकारने रोहिंग्यांना आश्रय दिला....
मंगलप्रभात लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या सचिन सावंत यांना भाजपने प्रतिआव्हान दिले आहे. रोहिंग्या आणि बांगलादेशींना हटवण्याची अधिकृत मागणी काँग्रेस करणार आहे का? तुमच्या सरकारने रोहिंग्यांना आश्रय दिला. आमचे सरकार त्यांना हटवण्याचे काम करते. रोहिंग्यांबद्दल खरंच चीड असेल तर भाजपसोबत उभे राहून त्यांना देशाबाहेर करण्याची मागणी करा, असे आव्हान भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी काँग्रेसला दिले आहे.