मुंबई : दुबईत बसलेल्या सूत्रधाराच्या इशाऱ्यावर देशभरातील सायबर फसवणूक आणि बेकायदा ऑनलाइन गेमिंगमधून मिळणाऱ्या पैशांची अफरातफर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-२ने पर्दाफाश केला आहे.
गोव्यातील कैडोलिम येथील एका आलिशान व्हिलावर छापा टाकून १२ जणांना अटक करण्यात आली. या टोळीने गेल्या सहा महिन्यांत ५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल केल्याचा संशय असून, तपासादरम्यान या रॅकेटशी संबंधित १०० कोटी रुपयांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. या कारवाईची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
अटक करण्यात आलेले आरोपी गुजरात आणि मुंबईतील रहिवासी असून, त्यांच्यावर सायबर फसवणुकीतील रक्कम विविध खात्यांमधून फिरविण्याची जबाबदारी होती. पायधुनी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासातून या रॅकेटचा उलगडा झाला. यापूर्वी अटक केलेल्या आरोपींची चौकशी आणि डिजिटल पुराव्यांच्या विश्लेषणातून गोव्यातून मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणुकीचा आर्थिक व्यवहार सुरू असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने ४ ऑगस्ट रोजी गोव्यातील कळंगुट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कासा डी निकोल व्हिला येथे छापा टाकला. दरमहा पगारी आरोपी उपायुक्त राजतिलक रोशन यांनी सांगितले की, संपूर्ण रॅकेटचे नियंत्रण दुबईतून केले जात होते.
आरोपींना दरमहा ३५ हजार रुपये वेतन आणि व्यवहाराच्या रकमेवर ३ टक्के कमिशन दिले जात होते. '१०० पॅनल' आणि 'रुद्रा' या ऑनलाइन बेटिंग व सायबर फसवणुकीशी संबंधित अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पैसे जमा करणे आणि काढण्याचे व्यवहार केले जात होते. बँका आणि तपास यंत्रणांची नजर चुकवण्यासाठी फसवणुकीतील रक्कम शेकडो बँक खात्यांमध्ये छोट्या-छोट्या व्यवहारांत विभागून पाठवली जात होती.
या कारवाईत पोलिसांनी १५ लॅपटॉप, ८५ मोबाईल फोन, १२८ एटीएम कार्ड, ७६ सिमकार्ड, २२ चेकबुक, ७७ पासबुक तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. प्राथमिक फॉरेन्सिक तपासात १५० हून अधिक सक्रिय बँक खात्यांची माहिती समोर आली आहे. तांत्रिक विश्लेषणात या खात्यांचा संबंध राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर देशभरातून नोंदविण्यात आलेल्या ८३ सायबर फसवणुकीच्या तक्रारींशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील दुबईस्थित मुख्य सूत्रधारासह इतर आरोपींचा शोध सुरू असून, हवाला, मनी लॉन्डरिंग आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांचाही तपास केला जात आहे.
गोव्यातून १२ जण अटकेत
१०० कोटींची बँक खाती फ्रीझ
१५० हून अधिक बँक खाती तपासाच्या कक्षेत १५ लॅपटॉप
८५ मोबाईल, १२८ एटीएम कार्ड
७६ सिमकार्ड, २२ चेकबुक आणि ७७ पासबुक जप्त