

नवी मुंबई : थंडीचा हंगाम सुरू होताच बाजारात शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी वाढली असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने शेवग्याच्या शेंगांचे दर चांगलेच वधारले आहेत. सध्या किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगा तब्बल 200 रुपये किलो, तर पाव किलोसाठी 50 रुपये मोजावे लागत आहेत.
महागाई असूनही शेवग्याच्या शेंगांना ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. मुंबईच्या बाजारात महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील विविध भागांतून शेवग्याची आवक होते. सध्या दक्षिण भारतातील हंगाम सुरू असल्याने लांबट शेंगा मोठ्या प्रमाणात बाजारात दिसून येत आहेत. त्याचबरोबर गुजरातमधील शेवग्याचाही हंगाम सुरू झाला असून हा हंगाम तीन ते चार महिने चालण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अधूनमधून महाराष्ट्रातील शेवगाही बाजारात येत असला, तरी एकूण आवक मात्र मागणीच्या तुलनेत अपुरी ठरत आहे. याशिवाय शेवग्याच्या शेंगांची मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात होत असल्याने स्थानिक बाजारात उपलब्धता कमी झाली आहे. दररोज 200 ते 250 क्विंटल इतकी मागणी असताना, घाऊक बाजारात सध्या केवळ 50 ते 52 क्विंटल शेवग्याच्या शेंगांचीच आवक होत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ बसत नसून दर वाढल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
घाऊक बाजारात शेवग्याच्या शेंगांचे दर सरासरी 100 ते 150 रुपये किलो असताना, किरकोळ बाजारात हेच दर 200 रुपयांवर पोहोचले आहेत. थंडीच्या दिवसांत शेवग्याच्या शेंगांना मागणी अधिक वाढत असल्याने, पुढील काही काळ तरी दर कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे.