मुंबई: पत्नीवर चाकूहल्ला करून पळून गेलेल्या आरोपी पतीला रात्री उशिरा डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. कृष्णा बलप्पा यादव असे या ३६ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन त्याने त्याची पत्नी अंजम्मा ऊर्फ शंकरम्मा कृष्णा यादव (वय ३७) हिच्यावर चाकूने गळ्यावर वार करुन हल्ला केला होता.
अंधेरीतील गिल्बर्ट हिल, न्यू अमर सोसायटीच्या मेहताब बाबा चाळीत कृष्णा हा त्याची पत्नी अंजम्मा हिच्यासोबत राहत होता. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तसेच त्याचेही एका महिलेशी प्रेमसंबंध होते.
याच कारणावरुन त्यांच्यात काही दिवसांपासून सतत वाद होत होते. तो तिला शिवीगाळ करुन बेदम मारहाण करत असे. २७ जुलैला पहाटे साडेपाच वाजता त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाला. यावेळी त्याने तिला शिवीगाळ करुन तिच्यावर चाकूने वार केले.
त्यात तिच्या गळ्याला, चेहर्याला, हाताला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत अंजम्माला नंतर स्थानिकांनी कूपर रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पती कृष्णा यादवविरुध्द हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
हल्ल्यानंतर पती पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्या पथकाने रात्री उशिरा कृष्णाला अंधेरी येथून अटक केली. चौकशीत त्याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, तसेच त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते, तिच्याशी बोलण्यावरुन त्याचे तिच्यासोबत नेहमीच भांडण होत होते. त्यातून त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची कबुली दिली.