

मुंबई: पूर्ववैमस्नातून सुमीत ऊर्फ पप्पू येरुणकर या सराईताची गोळ्या झाडून हत्या करुन पळून गेलेल्या मोक्का गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस तीन वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. सुमीत स्वस्तिक सावंत असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गोळीबारासाठी मुख्य आरोपींना घातक शस्त्रे पुरविल्याचाही आरोप आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी चुन्नाभट्टी पोलिसांकडे सोपविण्यात आले.
सुमीतने हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो चुन्नाभट्टी परिसरात राहत होता. २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी सव्वातीन वाजता चुन्नाभट्टी येथील व्ही.एन पुरव मार्गावरील आझाद गल्लीत सुमीतवर बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी अंधाधूंद गोळीबार केला होता. त्यात त्याच्यासह इतर चारजण जखमी झाले होते.
रुग्णालयात दाखल केलेल्या सुमीतला डॉक्टरांनी नंतर मृत घोषित केले होते तर इतर चौघांवर उपचार सुरु करण्यात आले होते. याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत नंतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तपास पूर्ण होताच त्यांच्याविरुद्ध मोक्का न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यात सुमीत सावंत याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. सुमीतने गोळीबारासाठी मुख्य आरोपींना घातक शस्त्रे पुरविले होते. गोळीबारानंतर तो मुंबईतून पळून गेला होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.
ही शोधमोहीम सुरु असताना तो नवी मुंबईत वास्तव्यास असल्याची माहिती युनिट सहाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर सोमवारी रात्री उशिरा सुमीतला खारघर येथील गितांजली ज्वेलर्सजवळील सेक्टर १९ समोरुन पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तो मोक्काच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले.
सुमीत हा खाजगी नोकरी करत असून सध्या चुन्नाभट्टी येथील रिलायन्स फ्रेशसमोरील स्वदेवी मिल चाळीत राहतो. गोळीबारानंतर तो मुंबईतून पळून गेला होता. अटकेच्या भीतीने तो गेल्या तीन वर्षांपासून गोवा, चेन्नई, राजस्थान, दिल्ली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तो दडून बसला होता. त्याला मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली.