मुंबई : महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात मित्रपक्षांकडून दाखल झालेले अर्ज मागे घेण्याची कसरत सुरू आहे. सुमारे 26 जागांवर महायुतीतील पक्षांकडून एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या जागांवर तोडगा काढण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये शिष्टाई सुरू आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मानखुर्द-शिवाजीनगर आणि मोर्शी विधानसभा मतदारसंघात माघार घेणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार एकमेकांविरोधात भिडणार, हे नक्की झाले आहे.
शिवाजीनगर-मानखुर्द आणि मोर्शी विधानसभा मतदारसंघांवरून सध्या महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघात माजी मंत्री नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. त्याला भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिकांचा प्रचार करणार नसल्याचे मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भूमिकेला दुजोरा दिला. नवाब मलिकांचा प्रचारच करणार नसल्याने त्यांना निकालानंतर सरकारमध्ये कसे घेणार, असा प्रतिप्रश्न करत भाजपने तडजोडीची शक्यता फेटाळून लावली. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट एकत्रितपणे अजित पवार गटाच्या मलिकांच्या विरोधात राहणार आहे.