

मुंबई : धारावी येथे अरमान रमजान शहा या २३ वर्षांच्या तरुणाची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून धारावी पोलिसांनी साहिल दिनेश कुमार या आरोपीला अटक केली. त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने १५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अरमान हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी असून सध्या तो धारावी परिसरात राहतो. याच परिसरातील एका गारमेंट कारखान्यात तो कामाला होता. साहिल हा त्याचा परिचित आहे. त्याच्या बहिणीसोबत अरमानची मैत्री होती. या मैत्रीवरुन त्यांच्यात वाद झाला होता.
बुधवारी सायंकाळी सव्वासात वाजता अरमान हा कारखान्यात कामाला होता. यावेळी तिथे साहिल आला आणि त्याने त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर त्याने त्याच्याकडील चाकूने त्याच्यावर वार केले. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्यामुळे त्याला कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने धारावीत खळबळ माजली आहे.
प्रेमसंबंधाच्या संशयावरून खून
खुनाची माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कारखान्याच्या मालकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी साहिलविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या साहिलला काही तासांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बहिणीसोबत असलेल्या मैत्री व कथित प्रेमसंबंधाच्या संशयावरुन ही हत्या झाल्याचे बोलले जाते. मात्र पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.