

Mumbai Pune Sunlight downfall Reason
मुंबई : हवा प्रदूषणामुळे सर्वत्र पसरलेला काळोख, ढगाळ वातावरण आणि अनियमित पावसामुळे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेसह उजेडाच्या तासांमध्ये घट होत चालली आहे. गेल्या तीन दशकांत भारतातील सूर्यप्रकाशाच्या तासांमध्ये सातत्याने घट झाल्याचे समोर आले आहे. याचा फटका मुंबई आणि पुण्यालाही बसत आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत 8.6 तास प्रतिवर्ष तर पुण्यात 3.1 तास प्रतिवर्ष सूर्यप्रकाश कमी होत असल्याची माहिती बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटरोलॉजी आणि इंडियन मीटरोलॉजिकल डिपार्टमेंटच्या संयुक्त अभ्यासातून समोर आली आहे.
देशभरात सूर्यप्रकाशाच्या तासात घट होताना दिसत आहे. उत्तर भारतातील मैदानी भागात दरवर्षी सरासरी 13.1 तासांनी सूर्यप्रकाश घटत आहे. पश्चिम किनारपट्टीवर सरासरी 8.6 तासांची घट, तर पूर्व किनारा, दख्खनच्या पठारी भागात आणि मध्य भारतात अनुक्रमे 4.9, 3.1 आणि 4.7 तासांची घट नोंदवली गेली. केवळ ईशान्य भारतात किंचित स्थिरता दिसून आली; मात्र तीही तात्पुरती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबई आणि पुण्याचा दररोजचा विचार केल्यास अनुक्रमे दीड व अर्धा मिनिटाने सूर्यप्रकाशाचे तास कमी होत चालले आहेत.
सूर्यप्रकाशाच्या तासातील घट केवळ नैसर्गिक ढगांमुळे नाही; तर हवेतील औद्योगिक धूर, वाहनांमधून निघणारे सूक्ष्म कण आणि बायोमास जळण्यामुळे तयार होणारे पार्टिक्युलेट मॅटरमुळे घटत आहे. हे सूक्ष्म कण ढगातील थेंबांचे आकार लहान करतात व त्यांचा आयुष्यकाळ वाढवतात. परिणामी ढगांचे आवरण अधिक काळ टिकते आणि सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचण्याचे प्रमाण कमी होते. हेच घटक यावर्षीच्या पावसाळ्यातही प्रकर्षाने जाणवले.
पाऊस नसताना देखील अनेक भागांत सतत आकाश ढगाळ होते. हे संशोधन आंतरराष्ट्रीय नेचर्स स्टँटिफिक रिपोर्ट या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. यामध्ये 1988 ते 2018 या कालावधीत देशभरातील 20 हवामान केंद्रांवरून सूर्यप्रकाशाचे तास मोजण्यात आले. या सर्व केंद्रांमधून मिळालेल्या डेटाच्या आधारे संशोधकांनी सोलार डिमिंग म्हणजेच सूर्यप्रकाश कमी होण्याचे प्रमाण मोजले.
गेल्या 30 वर्षांत मुंबईत एकूण घट : 258 तास (सुमारे 10.75 दिवसांचा सूर्यप्रकाश)
गेल्या 30 वर्षांत पुण्यात एकूण घट : 93 तास (सुमारे 3.9 दिवसांचा सूर्यप्रकाश)
सौरऊर्जा, कृषी उत्पादनावर सावट
भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सौरऊर्जा बाजारांपैकी एक आहे. पण सूर्यप्रकाश कमी झाल्यास सौरऊर्जा प्रकल्पांची कार्यक्षमता घटू शकते. दीर्घकालीन नियोजनावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. याशिवाय प्रकाश कमी झाल्यास वनस्पतींच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कृषी उत्पादनात घट, पीक कापणीतील विलंब आणि हवामान अंदाजातील अचूकता कमी होण्याची शक्यता आहे.