

धारावी: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने धारावीतील कुंभारवाड्यात मातीचे दिवे खरेदी करण्यासाठी किरकोळ विक्रेते तसेच सर्वसामान्य ग्राहकांची लगबग वाढली आहे.
पारंपरिक पणत्यांपासून आकर्षक फॅन्सी दिव्यांपर्यंत विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले असून ग्राहकांच्या पसंतीनुसार वेगवेगळ्या आकारांचे आणि डिझाइनचे दिवे तयार करण्यात कुंभार बांधव व्यग्र आहेत.
पिढ्यान्पिढ्या सुरू असलेल्या या पारंपरिक व्यवसायाला दिवाळीच्या हंगामात चांगली चालना मिळत आहे. कुंभारवाड्यात साध्या मातीच्या दिव्यांपासून ते कलाकुसर केलेल्या सजावटीच्या फॅन्सी दिव्यांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत.
दीड इंच आकाराच्या साध्या दिव्यांचे १०० नग १५० रुपयांना मिळतात, तर फॅन्सी दिव्यांचे दर आकार आणि डिझाइननुसार ७० रुपयांपासून ३५० ते ४०० रुपयांपर्यंत आहेत. हे दिवे २, ४, ५ आणि ६ नगांच्या पॅकेटमध्ये विक्रीसाठी याठिकाणी उपलब्ध आहेत.
गुजरातमधील थान आणि कलकत्ता येथून साच्यांच्या साहाय्याने तयार केलेले साधे दिवे धारावीच्या कुंभारवाड्यात आणले जातात. त्यानंतर त्यांच्यावर आकर्षक कलाकुसर, रंगरंगोटी करून पॅकिंग करून विक्रीसाठी ठेवले जातात.
कुंभारवाड्यात गुजराती कुंभार समाजाची सुमारे ४ ते ५ हजार कुटुंबे वास्तव्यास असून हा व्यवसाय अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन आहे. डिसेंबरनंतर पुढील वर्षभर याठिकाणी दिवे तसेच सुमारे ८० टक्के कच्च्या मालाची तयारी केली जाते.
काही दिव्यांची विक्री नगानुसार, तर काहींची जोडीने केली जाते. लक्ष्मीच्या पावलांच्या आकारातील फॅन्सी दिव्यांच्या जोड्या २५ ते ६० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. शंखाच्या आकारातील दिवे, हत्ती दिवे आणि लक्ष्मी दिव्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.
प्रवीण परमार यांच्या माहितीनुसार, या दिव्यांचे दर २५, ४० आणि ६० रुपये आहेत. अर्ध्या डिझाइनचे दिवे ८० रुपयांना, साधे दिवे १० ते १५ रुपयांना, तर छत्रीच्या आकारातील दिव्यांची जोडी १२० रुपयांना विकली जात आहे. ५ फॅन्सी दिव्यांचा संचही ग्राहकांसाठी उपलब्ध असून यंदा दर स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवाळीच्या हंगामासाठी दिवे तयार करण्याचे काम आधीपासूनच सुरू होते. दिवे घडवणे, त्यांना आकर्षक आकार देणे आणि ग्राहकांच्या मागणीनुसार विविध डिझाइन तयार करणे अशा कामांमुळे कुंभारवाड्यात सध्या मोठी लगबग पाहायला मिळत आहे. आधुनिक सजावटीच्या वस्तूंची बाजारपेठ वाढत असतानाही पारंपरिक मातीच्या दिव्यांचे महत्त्व कायम असल्याचे धारावीच्या कुंभारवाड्यातील चित्रातून दिसून येत आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत मागणी
धारावीच्या कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या दिव्यांना मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूर तसेच गुजरातमधील वापी आणि बलसाड आदी भागांतून मोठी मागणी आहे. घाऊक आणि किरकोळ व्यापारी येथे येऊन दिव्यांची खरेदी करतात. काही उत्पादकांचा माल अमेरिका आणि जपानसारख्या देशांमध्येही पाठवला जात असल्याने या पारंपरिक व्यवसायाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचली आहे.