

मुंबई : धनगर समाजाच्या घटनादत्त अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास अधिवेशनानंतर खासदार, आमदार या लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात गाठून जाब विचारणार,असा इशारा धनगर समाज बांधवांनी आझाद मैदातील आंदोलनादरम्यान दिला.
समाजाला एस. टी. आरक्षण मिळावे या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांनी आझाद मैदानात 16 मार्चपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात याठिकाणी आले आहेत.
बोऱ्हाडे यांच्या उपोषणाचा सोमवारी 8 वा दिवस होता. यावेळी येळकोट यळकोट, जय मल्हार, ‘एकच मिशन, धनगर एसटी आरक्षण अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांच्यासह विविध संघटनांनी बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला याठिकाणी येऊन पाठिंबा दिला.
यावेळी गंगाधर काळकुटे म्हणाले, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील व मराठा समाज हा तुमच्या बरोबर आहेत. आम्हाला राजकारण करायचे नाही. तुमच्या हातात हात घालून काम करु, आम्ही तुमच्या पाठिशी ताकदीने उभे राहू. धनगर समााजाच्या मुला-बाळांसाठी दीपक बोऱ्हाडे यांची ही लढाई सुरु आहे. यानंतर उपोषणाला अनेकांनी पाठिंबा देत मते व्यक्त केली.