

Dharmendra
मुंबई : बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र या जगात नसले तरी त्यांच्या आठवणी अनेक लोकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. प्रत्येकजण त्यांच्याबद्दल बोलत आहे. धर्मेंद्र हिंदी सिनेमातील एक मोठे स्टार होते, पण असे असूनही त्यांना साधे जीवन जगायला आवडत असे. त्यांचे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होते, केवळ पत्नी आणि मुलांवरच नाही, तर त्यांनी आपल्या भाऊ आणि पुतण्यांप्रतीही सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते आपल्या वडिलांची प्रत्येक गोष्ट मानत असत, म्हणूनच त्यांनी आपल्या पूर्वजांची कोट्यवधींची जमीन पुतण्यांच्या नावावर केली होती.
धर्मेंद्र यांना त्यांच्या वडिलांच्या डांगो या गावावर खूप प्रेम होते, जिथे त्यांची बरीच वडिलोपार्जित जमीन होती. भास्करच्या रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांच्या वडिलांनी त्यांच्याकडून वचन घेतले होते की ते त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीची काळजी घेतील आणि म्हणूनच धर्मेंद्र यांनी ती जमीन आपल्या काकांच्या मुलांच्या नावावर केली. आज त्यांची मुले ती मालमत्ता सांभाळत आहेत. याच रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की, धर्मेंद्र यांच्या चुलत भावाच्या मुलाचे, म्हणजेच त्यांच्या पुतण्याचे नाव बुटा सिंह आहे आणि ते लुधियानामधील एका कापड फॅक्टरीमध्ये काम करतात. धर्मेंद्र यांनी सर्व मालमत्ता त्यांना सुपूर्द केल्याचे त्यांनी स्वतः सांगितले.
बुटा सिंह यांनी सांगितले की, जेव्हा धर्मेंद्र मुंबईला गेले, तेव्हा त्यांचे आजोबा (धर्मेंद्र यांचे काका) घरातून मेवा बनवून त्यांच्यासाठी मुंबईला घेऊन जात असत. 24 तास ट्रेनमध्ये प्रवास करून ते धर्मेंद्रसाठी घरचे पदार्थ घेऊन जात. बुटा सिंह म्हणाले की त्यांचे आजोबा कधी धर्मेंद्र यांच्यासाठी बर्फी तर कधी भाजी बनवून घेऊन जात असत आणि ते खूप आवडीने हे सर्व खायचे. धर्मेंद्र नेहमी म्हणायचे की जेव्हा ते मुंबईत येतील, तेव्हा त्यांनी घरचा मेवा नक्की आणावा.
धर्मेंद्र मुंबईत स्थायिक झाले असले तरी, त्यांचा जास्तीत जास्त वेळ धावपळीपासून दूर लोणावळ्यातील एका शांत ठिकाणी असलेल्या फार्म हाऊसवर जात असे. हिरवळ, शेत आणि पायवाटांमध्ये बनलेल्या त्यांच्या सुंदर घरात ते त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत राहत होते.
24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचे निधन मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी झाले. ते 89 वर्षांचे होते आणि दीर्घकाळ आरोग्य समस्यांनी त्रस्त होते. 27 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने त्यांच्यासाठी 'सेलिब्रेशन ऑफ लाइफ' नावाच्या प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. ही प्रार्थना सभा मुंबईतील ताज लँड्स एंड येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रार्थना सभेत शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि इतर अनेक बॉलिवूडचे मोठे तारे उपस्थित होते. तर दुसरीकडे, हेमा मालिनी यांनीही त्यांच्या घरी धर्मेंद्र यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा केली होती.