

मुंबई: काँग्रेस व त्यांच्या चट्ट्याबट्ट्यांनी कायमच महिला आरक्षणाला आणि त्यांच्या सक्षमीकरणाला विरोध केला. भाजपचा मोर्चा पाहून विरोधकांची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही.
जोपर्यंत विरोधकांच्या नाकावर टिच्चून लोकसभेत आणि विधानसभेत 33 टक्के महिला निवडून देत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला.
नारीशक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयकाविरोधात मतदान केल्याच्या निषेधार्थ मुंबईत भाजपने काढलेल्या जनआक्रोश मोर्चानंतर वरळी येथील समारोपाच्या सभेत फडणवीस बोलत होते.विरोधकांच्या आक्षेपांचा समाचार घेत फडणवीस म्हणाले, महिलांना सक्षम करण्याचा काँग्रेसचा कधीच हेतू नव्हता.
इतिहासात जेव्हा तसे प्रयत्न झाले तेव्हा काँग्रेसने विरोधाचीच भूमिका घेतली. 2023 साली भाजपच्या नेतृत्वातील सरकारकडे दोन तृतीयांश बहुमताचे संख्याबळ होते. विरोध केला तरी भाजपने आणलेला महिला आरक्षणाचा कायदा संमत होणार असल्यानेच काँग्रेसने तेव्हा मन मारून विधेयकाला पाठिंबा दिला.
आता भाजपकडे साधे बहुमत आहे. दोन तृतीयांशचे संख्याबळ नाही. हे माहीत असल्यानेच काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांनी आरक्षण लागू करण्यासाठीच्या घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध केला.
आरक्षण आताच लागू करा, या विरोधकांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री म्हणाले, 2023 च्या घटना दुरुस्तीनुसार जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतरच आरक्षणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जनगणनेची प्रक्रिया 2028 पर्यंत पूर्ण होऊ शकते आणि 2032 पर्यंत त्याची पूर्ण अंमलबजावणी शक्य आहे.
महिलांना जलद न्याय देण्यासाठी 2011 च्या जनगणनेच्या आधारे ही प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोदी सरकारने घटनादुरुस्ती विधेयक आणले. तरीही विधेयक पाडण्याचा नालायकपणा विरोधकांनी केला. वरळीतील जांभोरी मैदान ते वरळी डोमपर्यंत काढलेल्या या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, मंत्री गिरीश महाजन व आशिष शेलार, भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर, अमित साटम आणि चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक सहभागी झाले.
वाहतूक कोंडीवरून संताप
भाजपच्या या मोर्चामुळे वरळी परिसरात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने आंदोलनस्थळी थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आंदोलन करायचे असेल तर शेजारच्या मैदानात करा. रस्ता कशाला अडवता, चालते व्हा, अशा शब्दात या महिलेने आपला आक्रोश व्यक्त केला. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.