

Maharashtra politics
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी 'देवाभाऊ' असा उल्लेख असलेली एक जाहिरात सर्वच दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. या निनावी छापलेल्या जाहिरातीवरून विरोधकांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर टीका करतानाच "महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का?" असा प्रश्न मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला. यावर बावनकुळे यांनीही प्रत्युत्तर देत रोहित पवार यांनी फारच मोठा शोध लावल्याचे म्हटले आहे.
"रोहित पवार तुम्ही फारच मोठा शोध लावला. महसूलमंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला ९० कोटींचा दंड माफ केला, हा आरोप सिद्ध करा. अन्यथा, राजकीय संन्यास घ्या," असे आवाहन बावनकुळे यांनी पवार यांना केले आहे.
राेहित पवार यांनी रविवारी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मंत्री बावनकुळे यांना म्हटले की, "तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निनावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?" असा प्रश्न पवार यांनी केला.
"या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही, तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का? या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर करा," असे आवाहन पवार यांनी केले.