

Demand for luxury homes has decreased in the state
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
एका बाजूला देशातील सर्वात मोठा 639 कोटींचा गृहविक्री व्यवहार मुंबईत होत असताना राज्यात अडीच कोटींहून अधिक किमतींची आलिशान घरे विक्रीविना पडून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विक्री न झालेल्या आलिशान घरांचे प्रमाण 36 टक्क्यांनी वाढले आहे.
गेल्या वर्षी 2024च्या पहिल्या तिमाहीत 6 हजार 180 आलिशान घरांची विक्री होऊ शकली नव्हती. यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत हीच संख्या 8 हजार 420 वर पोहोचली आहे. म्हणजेच विक्री न झालेल्या घरांच्या साठ्यात 36 टक्के वाढ झाली आहे.
2022 नंतर प्रथमच अशी वाढ दिसून येत आहे. 2023च्या पहिल्या तिमाहीत विक्री न झालेल्या घरांच्या साठ्यात 29 टक्के घट झाली होती. 2022 साली 18 हजार 340 घरे, तर 2023 साली 13 हजार 40 घरे विकली गेली नव्हती.पहिल्या तिमाहीतील 2024 साली 53 टक्के नोंदवली गेली होती. त्यानंतर आता झालेली 36 टक्के वाढ गृहविक्री क्षेत्रासाठी चिंतेचे कारण ठरत आहे.
एका बाजूला विक्री न झालेल्या घरांची संख्या वाढलेली असताना विक्री झालेल्या घरांची संख्याही तितकीच लक्षणीय आहे. घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा हा परिणाम आहे. 2025च्या जानेवारी ते मे या काळात 64 हजार 461 आलिशान घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच काळात 60 हजार 818 घरांची विक्री झाली होती. यावर्षी झालेली वाढ 6 टक्के आहे.
अॅनारॉक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. यावर्षी केवळ मे महिन्यात 11 हजार 565 घरांची विक्री झाली, तर मे 2024मध्ये 11 हजार 999 घरांची विक्री झाली होती. यंदाची विक्री गेल्या 7 वर्षांतील दुसर्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री आहे. जानेवारी ते मे या काळात विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत 1.59 कोटी आहे. गेल्या 7 वर्षांतील हा सर्वात मोठा आकडा आहे.