

Mumbai BMC Elections 2026: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील गोंधळावरून आरोप करण्यात येत आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दुबार मतदार आणि मतदार यादीत चुकीची नावे असल्याचे सांगत जोरदार टीका केली आहे. मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव सांगत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, मतदार यादीत दुबार नोंदींचा मोठा घोळ करण्यात आला आहे. जिवंत नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत आहेत, तर अनेक जिवंत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. मुंबईकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांनी सांगितले की, मतदार क्रमांक असूनही मतदान करण्यासाठी त्यांना सुमारे दीड मिनिटे लागली. “आता सुरुवातीला एवढा वेळ लागत असेल, तर जसजशा रांगा वाढतील तसतसा सामान्य मतदारांना किती वेळ ताटकळत उभे राहावे लागेल, याचा विचार प्रशासनाने करावा,” असेही त्या म्हणाल्या.
मतदार यादीतील या गोंधळामुळे अनेक नागरिकांमध्ये नाराजी आहे. काही ठिकाणी मतदारांचे नावे न सापडल्याने मतदान न करताच परत जावे लागल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, मतदार हुशार आहेत आणि अशा प्रकारे दिशाभूल करून मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल, असा गैरसमज कुणीही करून घेऊ नये.
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निवडणूक प्रशासनाने मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त कराव्यात, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मतदान प्रक्रिया सोपी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.