

Datta Bharne on CM Devendra Fadnavis : "चांगली माणसं महाराष्ट्रात राहिलीच पाहिजेत. पांडुरंगाकडे एकच विनंती करू, योग्य वेळी देवाभाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून लांब आहे, म्हणूनच मी 'योग्य वेळी' म्हणतोय," असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी आज केले. कर्जमाफीच्या निर्णयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईत झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू केल्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता भरणे म्हणाले की, "आज महायुतीत आपण एकत्र आहोत. शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीची माहिती पोहोचली पाहिजे, यासाठी हा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, पिके वाहून गेली, अशात आपल्याला कोणी मदत केली असेल तर ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी. आज अजितदादा आपल्यात नाहीत. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फिल्डवर जात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. बोलणं सोपं पण करणं अवघड असतं."
संसार चालवतो तेव्हा सगळा विचार करावा लागतो. निवडणुका नाहीत, मात्र मदत केली पाहिजे, शेतकरी उभा राहिला पाहिजे, या विचारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली," असेही भरणे यांनी सांगितले.
"शेतकऱ्यांना महायुती सरकारने मदत केली. मात्र, मदत देऊनही चुकीचा प्रचार केला जात आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी कर्जमाफीचा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांची ४० हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. आपल्यासाठी काम करतात त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी मोठी मदत केली. मदत करणे सोपे नाही. ९० टक्के मार्क मिळाले तरी १० टक्के कमी का मिळाले, यासाठी प्रचार केला जातोय," असे प्रत्युत्तरही त्यांनी विरोधकांना दिले.
"चांगली माणसं महाराष्ट्रात राहिलीच पाहिजेत. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून लांब आहे, म्हणून मी 'योग्य वेळी' म्हणतोय. पांडुरंगाकडे एकच विनंती करू, योग्य वेळी देवाभाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी," असे सूचक विधानही भरणे यांनी यावेळी केले.
"राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पाहिजे. एआयच्या (AI) माध्यमातून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न आपण करतोय. महिला शेतकरी धोरण आणण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. पाणंद रस्ता योजनेसाठी महसूल मंत्री बावनकुळेंनी पुढाकार घेतला. नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना या दोन्हींचा विचार केला तर आतापर्यंत राज्याने ५७ हजार कोटी रुपये दिले आहेत. सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत जाणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांचे अनेक ठिकाणी सत्कार होतील, मात्र हा घरातला सत्कार आहे," असेही भरणे यांनी यावेळी सांगितले.