पुढारी ऑनलाईन डेस्क : कोसळणार्या पावसाच्या सरी, गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी डीजेवरील ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी’, ‘तुझी घागर उताणी रे गोपाळा’ या गाण्यांवर तरुणाईचा जल्लोष, अशा उत्साही वातावरणात मंगळवारी दहीहंडीचा सोहळा मुंबईसह राज्याभरात साजरा झाला. दरम्यान, मुंबईत दहीहंडी कार्यक्रमाला गालबोट लागले. थर लावताना २०६ गोविंदा जखमी झाले; तर वर्ध्यात दोन कार्यकर्त्यांचा शॉक लागून मृत्यू झाला. सुरज बावणे (वय 27) आणि सेजल बावणे (13) अशी मृतांची नावे आहेत. कल्याणमध्ये स्वागत कमानीचा भाग कोसळला.
ठाण्यात जय जवान पथकाने विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा चंग बांधून ताकदीने थर रचायला घेतले. थरावर थर सुरू असताना सगळ्यांच्या हृदयाचे ठोके चुकत होते. आठवा... नववा... दहावा थर लावताना उत्साह शिगेला पोहोचला. मात्र काही सेकंदात १० व्या थरावरील बालगोपाळ उठण्यापूर्वीच खालचा थर कोसळला आणि सर्वांचाच हिरमोड झाला. संस्कृती प्रतिष्ठान दहीहंडी आयोजकाकडून शेवटचा थराचा गोविंदा गुडघ्यापासून उठला नसल्याचे सांगत विश्वविक्रम हुकल्याचे आयोजकांनी जाहीर केले. त्यामुळे जोगेश्वरीच्या जय जवानचे पथक विश्वविक्रमाबरोबरच 25 लाखांच्या पारितोषिकालाही मुकले.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील दहीहंडींना हजेरी लावून गोविंदांचा उत्साह वाढविला. ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, चंकी पांडे, प्रसाद ओक, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, पृथ्वीक प्रताप, प्राजक्ता माळी आदी कलाकारांनी उपस्थिती लावली.