मुंबई : देशात व राज्यात होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व आयडियल 'दादर पर्यावरणपुरक सेलिब्रेटी दहिहंडी २०२४' ने यंदा महिला सुरक्षा आणि सन्मानाला प्राधान्य दिले आहे. दादरमधील 'पर्यावरणपूरक सेलिब्रिटी दहीहंडी २०२४' ची दहीहंडी 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेतील कलाकार अभिषेक राहळकर व मयूरी देशमुख यांनी फोडून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या दहीहंडी उत्सवामध्ये महिला अत्याचाराविरोधातील देखावा व तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचा देखावा शिवसागर गोविंदा पथक मालाड पूर्व यांच्याकडून दहीहंडीसाठी रचलेल्या तिसऱ्या थरावर सादर करण्यात आला. तसेच जॉली या विलेपार्लेतील महिला दहिहंडी पथक मंडळाकडून दाणपट्टा व तलवारबाजी याची प्रात्यक्षिक सादर केली गेली. सायबर सुरक्षा जागरूक तेवर फ्लैश मॉब हा नृत्यप्रकार साजरा केला गेला. त्यानंतर पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावेत, या विषयावर पथनाट्य व मंगळागौर सादर करण्यात आले.
नयन फाऊंडेशन यांच्या दिव्यांग व अंध बंधु-भगिनीच्या गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडली गेली. तसेच या कार्यक्रमामध्ये मयूरी देशमुख, सुहास खामकर, अभिषेक राहळकर, देवेंद्र कदम, कल्याणी खिमे, शार्मली सुखटंकर असे प्रसिद्ध कलाकारांसह रोहित राऊत, आशिष कुलकर्णी, संपदा कदम या गायकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुसकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.