

मुंबई : शुक्रवारी दादर रेल्वे स्टेशन परिसरातील चित्र पाहुन मुंबईकरही अचंबित झाले. रस्ते, पदपथ पहिल्यांदा त्यांच्या दृष्टीस पडले. कोणाचाही धक्का नाही की वाद. एकही फेरीवाला दिसला नाही. कधी नव्हे तो दादर स्डेशन परिसर फेरीवालामुक्त झाला होता.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने आंबेडकर अन्यायी चैत्यभूमीवर आले आहेत. त्यामुळे परिसरात गर्दी होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने दोन दिवस फेरीवाल्यांवर वक्रदृष्टी ठेवली आहे. फेरीवाल्यांना हटवले आहे. दादर पश्चिम इतकी रेल्वे स्टेशनलगत गर्दी मुंबईतील अन्य कोणत्याच स्टेशन लगत मुंबईकरांनी अनुभवली नाही. याचे कारण पदपथ व रस्ते फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत.
सणासुदीला तर बोट शिरले इतकीही जागा नसते.मात्र दोन दिवस मुंबईकर या परिसरात मोकळा श्वास घेत आहेत. रेल्वे स्टेशन परिसर व आजूबाजूचे रस्ते फेरीवालामुक्त दिसत आहेत. पदापदावर फेरीवाला बसताक्षणी त्याच्यावर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक संपूर्ण दादर परिसरात कार्यरत आहे. फेरीवाल्यांचा माल जप्त केल्यानंतर तो ठेवण्यासाठी गाड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. फेरीवाले बसू नये यासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत महापालिकेची टीम रेल्वे स्टेशन परिसरात येणारे दोन दिवस कार्यरत राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबईकरांनी महापालिकेच्या या कारवाईचे स्वागत केले असून कायमस्वरूपी अशी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.