

चिपळूण शहर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने 6 डिसेंबर 2025 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत महामार्गाच्या पूर्णत्वासाठी पुन्हा एकदा जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वरील कालावधीत या आंदोलनाला लोणेरे (ता. माणगाव, जि. रायगड) येथून सुरुवात होणार असून आंदोलनाची समाप्ती 11 जानेवारी रोजी संगमेश्वर (जि. रत्नागिरी) येथील रास्ता रोको आंदोलनाने होणार आहे.
गेली सतरा वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. दरवर्षी हे काम पूर्ण होण्यासाठी नवीन तारीख आणि नवीन डेडलाईन जाहीर केली जाते.
मात्र कामाची प्रगती न होता अजूनही महत्त्वाच्या परिसरातील कामे रेंगाळली आहेत. परिणामी वाहतूक कोंडीसह अपघात, त्यातून होणारे मृत्यू यांची मालिका आजपर्यंत सुरूच आहे. आजवर सुमारे 4 हजार 500 नागरिकांना अपघातामध्ये जीव गमवावा लागला आहे, तर हजारोंच्या संख्येने प्रवासी जखमी झाले आहेत. तरीदेखील महामार्ग सुरक्षितपणे वाहतुकीस खुला झालेला नाही. आता जनआक्रोश समितीच्या माध्यमातून संबंधित ठेकेदार व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार 6 डिसेंबरला जनआक्रोश समितीच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गावर अंत्ययात्रा आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत 6 ते 7 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. पासून लोणेरे ते कोलेटी येथे अंत्ययात्रा आंदोलन होणार आहे. त्यानंतर 13 ते 14 डिसेंबर रोजी खेड ते चिपळूण, 27 व 28 डिसेंबर रोजी लांजा ते हातखंबा, 3 व 4 जानेवारी रोजी हातखंबा ते संगमेश्वर व 10 आणि 11 जानेवारी रोजी सावर्डे ते संगमेश्वर येथे आंदोलन तसेच रास्ता रोको असे या आंदोलनाचे नियोजन असून यावेळी समस्त कोकणवासीयांच्या माध्यमातून समितीतर्फे शासनाकडे प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे.
निवेदनामध्ये स्वतंत्र उच्चस्तरीय तटस्थ समिती नेमून महामार्गाचे पारदर्शक व प्रभावी तर तटस्थपणे परीक्षण करावे. यामध्ये जनआक्रोश समितीचे चार सदस्य सामावून घ्यावेत, अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाईकरण्यात यावी. यामध्ये अर्धवट काम, विलंब आणि निष्काळजीपणास जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई करावी. महामार्गाच्या कामासाठी निश्चित व अंतीम मुदतीमध्ये स्पष्ट व अंतीम मुदत जाहीर करून त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे व प्रत्यक्षात दर आठवड्याला पाहणी करून प्रगतीचा अहवाल द्यावा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियोजन करावे, अर्धवट भागातील कामांवर तातडीने योग्य सूचनांचे फलक, महामार्गाची सद्यस्थिती, अडचणी व खर्च, विलंबाची कारणे, जबाबदार घटक आदींचा सविस्तर आणि सार्वजनिक अहवाल तातडीने जाहीर करावा, बाधीत अपघातग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, मृतांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई मिळावी.
महामार्गावर कायमस्वरूपी चोवीस तास ट्रामा केअर सेंटर उभारावे, स्थानिक जातीच्या वृक्षांचे रोपण करावे, महामार्गावर बाधीत झालेल्या झाडांची भरपाई म्हणून तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण करावे, आदी प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी, त्या-त्या ठिकाणच्या नागरिकांनी वरील तारखांना आपल्या भागातील आंदोलनात सहभागी होऊन शासनाला जाब विचारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.