

मुंबई ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे मतदान दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याने राज्यातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील अनेक शिक्षक अडचणीत सापडले आहेत. 7 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, याच दिवशी केंद्र शासनामार्फत घेतली जाणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) नियोजित आहे. त्यामुळे निवडणूक ड्युटी आणि महत्त्वाची पात्रता परीक्षा एकाच दिवशी आल्याने शिक्षकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनामार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पार पडली आहे. त्यानंतर आता केंद्राची सीटीईटी परीक्षा घेण्यात येत असून, सुरुवातीला ही परीक्षा 8 जानेवारी रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र परीक्षार्थींची संख्या वाढल्याने 7 व 8 फेब्रुवारी असे दोन दिवस परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला.
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आधी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी अचानक मतदानाच्या तारखेत बदल करत ती 7 फेब्रुवारी निश्चित केली.
अनेक शिक्षकांची परीक्षा केंद्रे पुणे, मुंबई यांसारख्या इतर शहरांमध्ये देण्यात आली आहेत. काही शिक्षकांची परीक्षा 7 फेब्रुवारी रोजी तर काहींची 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी परीक्षेसाठी शिक्षकांना एक दिवस आधी प्रवास करणे आणि मुक्कामाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत निवडणूक ड्युटी बजावत असताना परीक्षेला हजर राहणे अनेक शिक्षकांसाठी अशक्य ठरण्याची भीती आता व्यक्त होताना दिसत आहे.
एकीकडे निवडणूक ड्युटी ही सक्तीची लोकशाही जबाबदारी, तर दुसरीकडे आयुष्याची ‘रोजी-रोटी’ सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा या दोघांमध्ये राज्यातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक अडकले असल्याने या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी निवडणूक प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आता शिक्षकांकडून केली जात आहे.