

मुंबई : समुद्रात निसर्गत: तयार होणारे हिरे आणि प्रयोगशाळांमध्ये तयार केले जाणारे हिरे सरसकट हिरे म्हणूनच आतापर्यंत विकले जात. ग्राहकाने चौकशी केल्यानंतर आणि दरांचा फरक सांगताना कृत्रिम आणि नैसर्गिक हिरे यातला फरक सांगितला जायचा. यापुढे मात्र समुद्रात निसर्गत: तयार होणाऱ्या हिऱ्यांनाच हिरा म्हणा, असा दंडक भारतीय मानक ब्युरोने घातला आहे.
कृत्रिम आणि नैसर्गिक हिऱ्यांच्या खरेदीत खासकरून ऑनलाईन फसगत होत होती. त्याची दखल घेत भारतीय मानक ब्युरोने ग्राहकांसाठी हिऱ्याची व्याख्या सुस्पष्ट करत हिरे व्यापाऱ्यांसाठी कडक नियम जाहीर केले. ते असे-
यापुढे हिऱ्याचा उल्लेख फक्त हिरा असा केला जाईल आणि निसर्गत: निर्माण झालेल्या हिऱ्यालाच हिरा म्हटले जाईल. त्यास विक्रेते नॅचरल, ज्येन्युयन, रिअल किंवा प्रेशियस विशेषण लावू शकतील. अन्य कोणत्याही कृत्रिम हिऱ्यांना ही विशेषणे लावता येणार नाहीत.
प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांसमोर ‘प्रयोगशाळेत तयार केलेला हिरा’ किंवा लॅब क्रिएटेड डायमंड असा स्पष्ट व सविस्तर उल्लेख करावा लागेल. या उल्लेखात लॅब डायमंड किंवा लॅब ग्रोन्ड असा शॉर्टकट चालणार नाही. नेचर्स, प्युअर, अर्थफ्रेंडली किंवा कल्चर्ड या नावानेही हिरेविक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे.