

मुंबई : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका कापड व्यावसायिकाची सुमारे 90 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ॲन्थोनी चेट्टीयार ऊर्फ ॲन्थोनी साहिल, सोहेल खान आणि अमजदअली शेख अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार कापड व्यावसायिक असून ते विलेपार्ले येथे राहतात. त्यांची घाटकोपर येथे एका खासगी कंपनी असून या कंपनीतून त्यांचे सर्व व्यवहार चालतात. गेल्या वर्षीं त्यांची धु्रव मेहता या व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्याचा गारमेंटसह फॅब्ररिक अक्सेसरीजचा व्यवसाय आहे. त्यांचा सर्व व्यवहार क्रिप्टो करन्सीमध्ये चालत असून त्यात त्यांना रुपयांच्या तुलनेत जास्त फायदा होत असल्याचे सांगितले.
त्यामुळे त्यांनीही त्यांचे सर्व व्यवहार क्रिप्टो करन्सीमध्ये करण्याचा सल्ला दिला. त्याच्या परिचित काही डिलर असून ते त्यांना क्रिप्टो करन्सी देतील असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडून क्रिप्टो करन्सी घेण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे ते त्यांच्या भावासोबत ध्रुवच्या अंधेरीतील कार्यालयात गेले. तिथे धु्रवसोबत इतर सातजण उपस्थित होते.
यावेळी ध्रुवने त्यांची ओळख ॲन्थोनी साहिल, अमजद शेख, अजगर हुसैन, शेख अशफाक, मनोज प्रजापती आणि मोहम्मद तौसिन खान अशी करून दिली. ही रक्कम ॲन्थोनीला देण्यास सांगून त्याने त्यांना दिलेल्या क्यूआर लिंकवर क्रिस्टो करन्सी ट्रान्स्फर करणार असल्याचे सांगतले. त्यामुळे त्यांनी ॲन्थोनीला 90 लाख रुपये दिले. मात्र बराच वेळ होऊन त्यांनी त्यांना एक लाख युएसडीटी क्रिप्टो करन्सी पाठविली नाही.
त्यामुळे त्यांनी धु्रवसह इतर सातही आरोपींना संपर्क साधून याबाबत विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आठजणांविरुद्ध एमआडीसी पोलिसांत तक्रार केली. याच गुन्ह्यात एक महिन्यांपासून फरार असलेल्या ॲन्थोनी, सोहेल आणि अमजदअली यांंना पोलिसांनी अटक केली.