

Santosh Dhuri Criticism MNS: मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या 'ठाकरे बंधू' (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) यांच्या युतीला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे चित्र समोर आले आहे. मराठी मतांचे ध्रुवीकरण होऊन या युतीचा मोठा फायदा होईल, असा कयास राजकीय तज्ज्ञांकडून लावला जात होता; मात्र निकालात मनसेला भावाची साथ असूनही सत्तेपर्यंतच बहुमत मिळवता आलं नाही. दोन्ही पक्षांची कामगिरी पाहिली तर शिवसेनेने तुलनेने चांगली कामगिरी केली. मात्र मनसेला डबल डिजीट काही गाठता आली नाही.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत मनसेने स्वबळावर लढून ८ टक्के मते मिळवली होती. यंदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा आणि भावनिक साद असूनही मनसेची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. याउलट, २०१७ च्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चांगली कामगिरी करत ६० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. यावरून युतीचा फायदा फक्त एकाच बाजूला झाल्याचे स्पष्ट होत आहे.
मनसेला सोडचिठी दिलेले माजी नेते संतोष धुरी यांनी या परिस्थितीवर अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. "उद्धव ठाकरेंनी मनसेचा आणि राज ठाकरेंचा केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वापर करून घेतला," अशी टीका त्यांनी केली आहे. धुरी यांच्या मते, जागावाटपाच्या वेळी झालेला घोळ हा मनसेच्या पराभवाचे मुख्य कारण ठरला.
"ज्या शिवसेनेच्या (UBT) जागा ३५ ते ४० पर्यंत मर्यादित राहणार होत्या, त्या आज ६० च्या वर गेल्या आहेत. मग मनसे कुठे अडकली? तुमचा वापर करण्यात आला आहे, हे तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये का?" असा बोचरा सवाल धुरी यांनी राज ठाकरेंना उद्देशून केला आहे.
धुरी पुढे म्हणाले की, आता 'जर-तर'ची भाषा करण्याला काहीच अर्थ नाही. निकालातून वास्तव समोर आले आहे. मनसे अजून किती वर्षे दुसऱ्यांना जिंकवण्यासाठी मेहनत करणार? स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि वाढीसाठी कधीतरी स्वतःसाठी लढायला हवे.
या निकालामुळे आता ठाकरे बंधूंची ही युती आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार की मनसे पुन्हा एकदा स्वतंत्र वाटचाल करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.