

Mumbai Crime News:
मुंबई : वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली मित्रांनी केलेल्या क्रूर थट्टेमुळे २१ वर्षीय तरुण गंभीर भाजल्याची धक्कादायक घटना कुर्ला पश्चिम परिसरात घडली आहे. केक कापल्यानंतर मित्रांनी तरुणावर अंडी फेकली आणि त्यानंतर थेट पेट्रोल टाकून आग लावली. यामध्ये भाजलेल्या अब्दुल रहमान नावाच्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनोबा भावे पोलिसांनी या प्रकरणी पाचही संशयित आरोपी मित्रांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय घडलं?
कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी इमारतीमध्ये राहणारा अब्दुल रहमान याचा सोमवारी (दि. २५) २१ वा वाढदिवस होता. अब्दुलच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याचे ५ मित्र अयाझ मलिक, अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुझैफा खान आणि शरीफ शेख यांनी त्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी इमारतीखाली बोलावले. सोबत केकही आणला होता.
पेट्रोल टाकून आग लावली
अब्दुल खाली आल्यावर मित्रांनी केक कापला. केक कापतानाच त्यांनी आधी अब्दुलवर अंडी फेकली. मात्र, एवढ्यावरच न थांबता या पाचही मित्रांनी एका बॉटलमधून आणलेले पेट्रोल अब्दुलच्या अंगावर टाकले आणि त्याला आग लावली. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे संपूर्ण कृत्य कैद झाले आहे. आग लागल्यानंतर अब्दुलने त्वरित आपले कपडे काढून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र या दरम्यान तो गंभीर भाजला.
पाच आरोपींना पोलीस कोठडी
गंभीर जखमी झालेल्या अब्दुल रहमानला तातडीने जवळच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडिताने दिलेल्या तक्रारीवरून विनोबा भावे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने या पाचही आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.