

मुंबई : तुमच्या नाकर्तेपणामुळे मॅनहोलमध्ये पडून मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्याकरता एफआयआर कॉपीची गरज काय? असा सवाल करीत उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा कल्याण-डोंबिवली महापालिकेची कानउघाडणी केली.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्या मुलाच्या नातेवाइकांना भरपाई देणार की नाही? अशीही विचारणा पालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी केली.
उच्च न्यायालयाने 2018 मध्ये खड्डे व उघड्या मॅनहोल्सच्या प्रश्नावर विविध निर्देश दिले होते. त्याला अनुसरून रस्त्यांची देखभाल करण्यात महापालिका अपयशी ठरल्या, असा दावा करीत ॲड. रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका दाखल केली होती. ही याचिका खंडपीठाने निकाली काढली होती.मात्र मुसळधार पावसात डोंबिवलीतील उघड्या नाल्यात वाहून गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने उघड्या मॅनहोल्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी राज्य सरकारने अध्यादेश काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे, मॅनहोल यामुळे होणारे अपघात/मृत्यू याअनुषंगाने नुकसानभरपाई देण्यासंदर्भात अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई, यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्याचे परिपत्रक जरी केल्याची माहिती दिली.
तर कल्याण-डोंबिवली महापलिकेने याबाबत स्थापन केलेल्या कमिटीची एक बैठक झाली असून या कमिटीने प्रथम खबरी अहवाल, शवविच्छेदन अहवाल, पंचनामा व इतर कागदपत्रांची मागणी केली असून 27 नोव्हेंबरला बैठक निश्चित केल्याची माहिती खंडपीठाला दिली, तर मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व महापालिकांनी हायकोर्टाच्या निर्देशानुसार आशा घटनांत मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसानभरपाई देण्याकरता समिती स्थापन करण्यात आली असून मृतांना 6 लाखांपर्यंत, तर जखमींना 2.5 लाख ते 50 हजारांपर्यंतची नुकसानभारपाई देण्याचे मान्य करण्यात आल्याची माहिती दिली.
यावेळी मुंबई महापालिकेच्या वतीने ॲड.अनिल साखरे यांनी मुंबईत सध्या विविध मेट्रोसह विकासकामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदून बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे घडलेल्या दुर्घटनेसाठी नेमके कोणते प्राधिकरण जबाबदार हे निश्चित करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल,असे स्पष्ट केले.याची नोंद घेत खंडपीठाने याचिकेची सुनावणी तीन आठवडे तहकूब केली.
पश्चिम डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरातील जगदांबा माता मंदिराच्या जवळील उघड्या नाल्यात पडून रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आयुष एकनाथ कदम (13) याचा मृत्यू झाला होता.