

मुंबई : कूपर रुग्णालयात शुक्रवारी धक्कादायक प्रकार घडला. उपचारादरम्यान एका रुग्णाच्या नातलगांनी अचानक संतापाच्या भरात डॉक्टरला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुन्हा निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (सेंट्रल एमएआरडी)ने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. असोसिएशनच्या निवेदनानुसार, ही घटना कूपर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये घडली. डॉक्टर एक गंभीर अवस्थेतील रुग्णावर कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) करत असताना अचानक रुग्णाचा एक नातलग हिंसक झाला आणि डॉक्टरवर हल्ला चढवला. चेहरा, छाती आणि पोटावर वार करण्यात आले.
असोसिएशनने सुरक्षारक्षक घटनास्थळी असूनही त्यांनी हस्तक्षेप केला नाही, असा आरोप केला आहे. “हे तरुण डॉक्टर आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्यावर झालेला हा क्रूर हल्ला मानवतेवरच आघात आहे,” असे सेंट्रल एमएआरडीने म्हटले आहे. डॉक्टर हे समाजाचे सेवक आहेत, त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ले होणे असह्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
एमएआरडीने इशारा दिला आहे की, या प्रकरणात न्याय मिळण्यात उशीर झाल्यास राज्यभर आंदोलन छेडले जाईल. सरकार आणि समाजाने या प्रकाराला गांभीर्याने घेतले पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली आहे. डॉक्टरांवरील वारंवार होणारे हल्ले सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेच्या पायाला तडा देणारे असल्याचा इशाराही असोसिएशनने दिला आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सायंकाळी महापालिका मार्ड आणि कुपर मार्ड यांच्या सदस्यांकडून शांततेत मोर्चा काढण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या
आपत्कालीन व अतिदक्षता विभागात 247 प्रशिक्षित मार्शल/ एमएफएस दलाची नेमणूक
हल्लेखोरांवर वैद्यकीय सुरक्षा कायद्यांतर्गत अंतर्गत तातडीने कारवाई
निष्काळजी सुरक्षा पर्यवेक्षकांचे निलंबन
कायमस्वरूपी सशस्त्र सुरक्षा व उउढत देखरेख
बहुपर्यायी सुरक्षा प्रणाली सीमित प्रवेश, पॅनिक अलार्म, जलद प्रतिसाद पथक
दरमहा एमएआरडीच्या उपस्थितीत सुरक्षा लेखापरीक्षण