मुंबई/ठाणे/नागपूर : राज्यात सध्या पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन खरेदी प्रकरण गाजत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर शनिवारी गंभीर आरोप केला आहे. मंत्री सरनाईक यांनी मुंबईजवळील मीरा-भाईंदर परिसरात सुमारे 200 कोटी रुपये बाजारमूल्याची चार एकर जमीन केवळ 3 कोटी रुपयांना घेऊन विहंग एज्युकेशन ट्रस्टसाठी स्वतःची शैक्षणिक संस्था उभारल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या शासकीय पदाचा गैरवापर करून आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी अतिशय स्वस्त दरात ही मोठी जमीन मिळवली, असे हा गंभीर आरोप करताना वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. वडेट्टीवार म्हणाले, एखादा मंत्री आपल्या स्वतःच्या संस्थेसाठी अशाप्रकारे जमीन घेऊ शकतो का? जर हे महाराष्ट्रात चालणार असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. या जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीच्या पुणे येथील 40 एकर शासकीय जमीन व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्यानंतर आता लगेचच वडेट्टीवार यांनी थेट परिवहनमंत्री सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तक्रारीशिवाय चौकशी नाही : महसूलमंत्री बावनकुळे
दरम्यान, वडेट्टीवार यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वडेट्टीवार यांनी केवळ माध्यमांतून आरोप ऐकले आहेत, कोणतीही औपचारिक तक्रार प्राप्त झालेली नाही. हे लोक तक्रार दाखल करण्याऐवजी माध्यमांतून आरोप करण्यात अधिक वेळ घालवतात. जर तक्रार दाखल झाली, तर आम्ही चौकशीचे आदेश देऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे जमीन प्रकरणाचा संदर्भ देत बावनकुळे म्हणाले की, तेथे मुद्दा उपस्थित झाल्यावर राज्य सरकारने तातडीने चौकशी समिती नेमून तपास सुरू केला.
मी लाटलेली जमीन दाखवा : प्रताप सरनाईक
मीरा-भाईंदरमध्ये विहंग एज्युकेशन ट्रस्टसाठी शासनाची 200 कोटींची जमीन केवळ 3 कोटींना लाटल्याचा आरोप काँगे्रस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मी लाटलेली जमीन दाखवा, असे प्रतिआव्हान दिले आहे. मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील महसूल विभागाची चार एकर जमीन सध्या आरटीओच्या अधिपत्याखाली आहे. ही जमीन विहंग एज्युकेशन ट्रस्टला मिळावी यासाठी अर्ज केला होता, असे सांगून परिवहनमंत्री सरनाईक यांनी वडेट्टीवार यांनी केलेले आरोप फेटाळले. वडेट्टीवार निराधार आरोप करत आहेत, त्यांनी मी घेतलेली जमीन दाखवावी, असे प्रतिआव्हान मंत्री सरनाईक यांनी दिले.