

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्रित लढवण्याचे उद्धव व राज ठाकरे या बंधूंमध्ये जवळपास निश्चित झाले आहे. पण महापालिका निवडणुकीत काँग्रेस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या महाविकास आघाडीमध्ये मनसे नको असा सूर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावला आहे. मनसेसोबत निवडणूक लढवल्यास मुंबईत थोडंफार राहिलेले काँग्रेसचे अस्तित्व संपून जाईल, अशी भीतीच या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
मुंबई महानगरपालिकेमध्ये 1997 नंतर काँग्रेसची सत्ता आली नसली तरी, मुंबईत काँग्रेसची पकड मजबूत होती. काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत मुंबई अध्यक्ष असताना सहा लोकसभा मतदारसंघांपैकी 5 लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसचे खासदार निवडून आले होते तर एका मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला होता. 1992 ते 2012 पर्यंत मुंबईतील काँग्रेसची राजकीय कारकीर्द बऱ्यापैकी होती. 1992 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 112 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेस महापालिकेमध्ये एकहाती बहुमतात होती. मात्र 1997 मध्ये काँग्रेसची वाताहत लागली.
यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अवघे 49 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर 2002, 2007 व 2012 मध्ये काँग्रेसची महापालिकेत सत्ता नसली तरी सुमारे अनुक्रमे 60, 71, 52 नगरसेवक निवडून आले होते. मात्र 2012 नंतर काँग्रेसला उतरती कळा लागली. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत अवघे 31 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर काँग्रेसला मुंबईत स्वतःचे अस्तित्व निर्माण करता आले नाही.
मनसे आघाडीमध्ये सामील झाल्यास काँग्रेसचे पारंपरिक मुस्लिम मतदार दुखावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हे राजकीयदृष्ट्या घातक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीत मनसेला घेऊ नका, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. यावेळी काँग्रेसने आघाडीत सहभागी न होता स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी. जेणेकरून मुंबईतील काँग्रेसचे अस्तित्व अजूनही आहे की नाही हे दिसून येईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
नेत्यांमध्ये चलबिचल
मुंबईतील काँग्रेस नेत्यांमध्ये चलबिचल असून काही नेत्यांना आघाडीत मनसेसोबत जाणे योग्य असल्याचे वाटत आहे तर काही नेत्यांना कार्यकर्त्यांचे म्हणणे पटत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधातच भूमिका घेतलेली आहे. अशा पक्षाबरोबर एकत्रित निवडणूक लढवणे योग्य नसल्याचे पक्षश्रेष्ठींना मुंबईतील वरिष्ठ नेत्यांमार्फत कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिकेत काँग्रेसची कामगिरी
वर्ष जागा
1992 112
1997 49
2002 60
2007 71
2012 52
2017 31