Mumbai Road Crossing
मुंबई : पादचारी अपघातांत वाढ झाल्याने वाहतूक विभागाने केलेल्या सूचनेनुसार मुंबईतील पदपथांवर जी. एफ. आर. सी. रेलिंग बसवण्यात येत आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मुंबईत कुठेही रस्ता ओलांडणे पादचाऱ्यांना शक्य होणार नाही.
एप्रिल 2023 पासून हे काम सुरू असून आतापर्यंत 38 हजार 922 मीटर लांबीचे रेलिंग बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबईतील पदपथ सुरक्षित असावेत यासाठी पोलीस सहआयुक्त (वाहतूक) यांनी रेलिंग बसवण्याची सूचना मुंबई महापालिकेला केली होती. त्यानुसार महापालिकेने 414 कोटींचे काम ठेकेदाराला दिले आहे. या खर्चामध्ये अन्य स्ट्रीट फर्निचरचाही समावेश आहे. यात बाकडी व अन्य साहित्य असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
वेगाने वाढणारे शहरीकरण आणि वाहनांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमुळे पदपथ वापरणारे विकलांग, वयोवृद्ध व अन्य नागरिक आदींची सुरक्षा लक्षात घेऊन रेलिंग बसवण्यात येत आहेत.
पदपथ मोकळे असल्यामुळे नागरिक कुठूनही रस्ता ओलांडतात, त्यामुळे लहान-मोठे अपघात होतात; परंतु आता रेलिंगमुळे रस्ता ओलांडणे येणार नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही कमी होईल,असा दावा पालिकेकडून केला जात आहे.