

मुंबई : मिरा-भाईंदर येथील मेट्रो 9 प्रकल्पातील एका उड्डाणपुलाचे आरेखन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. 4 मार्गिकांचा पूल एका ठिकाणी 2 मार्गिकांचा होत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पुलाचे आरेखन योग्यच असल्याचा दावा करणारे स्पष्टीकरण एमएमआरडीएने दिले आहे.
मेट्रो 9 प्रकल्पांतर्गत मिरा-भाईंदर येथे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. 4 मार्गिकांचा हा पूल असून एके ठिकाणी तो 2 मार्गिकांचा होत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर स्पष्टीकरण देताना एमएमआरडीएने सांगितले आहे की, या 4 पदरी पुलाचे विभाजन होऊन दोन भिन्न मार्गिका काढल्या जातील. एक मार्गिका भाईंदर पूर्वेला तर दुसरी भाईंदर पश्चिमेला जाणार आहे.
पुलाच्या आरेखनानुसार आधी भाईंदर पूर्वेच्या मार्गिकेचे काम केले जात असल्याने सध्या केवळ दुपदरी पूल दिसत आहे. या पुलाचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. रुंदीकरण झाल्यास दोन्ही बाजूंना एकेक अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होईल. भविष्यात आणखी एक दुपदरी पूल पश्चिमेकडे जाण्यासाठी बांधण्यात येणार आहे. हा पूल पश्चिम रेल्वे मार्गावरून जाईल. गोल्डन नेस्ट सर्कल येथे पाच रस्ते एकत्र येत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी दुपदरी उड्डाणपूल मेट्रो मार्गिकेशी जोडला जाईल. तसेच उड्डाणपुलावरून खाली उतरण्यासाठी दोन्ही बाजूंना रस्ते असतील. यामुळे वाहतुकीचे नियोजन योग्यप्रकारे होईल.